मुंबई, दि. 31 - घाटकोपर साईदर्शन इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत मिळणार आहे. याआधी राज्य सरकारकडूनही मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन देत असताना ही घोषणा केली होती. मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींवर सर्व उपचार मोफत केला जाणार असून, त्यांना 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. विधानसभेत निवेदन देत असताना मुख्यमंत्र्यांनी घरदुरुस्तीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर महत्त्वाची माहितीही दिली होती.
Ghatkopar(Mumbai) building collapse: PM Modi approved Rs 2 lakhs each for next of kin of those who died and Rs 50,000 for those injured
— ANI (@ANI_news) July 31, 2017
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की, 'घरबांधणीची प्रणाली ऑनलाईन करण्यात आली आहे. इमारतींच्या मालकांनी ऑडिट न केल्यास ऑनलाईन सिस्टिममधून त्यांना नोटीस जाईल, अशी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. यासंदर्भात मी आयुक्तांशी बोललो आहे'. तसंच 30 वर्षे जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं असून, महापालिकेच्या माध्यमातून जुन्या इमारतींना याबाबत सूचना देण्यात येणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं.
घरदुरुस्तीसाठीची परवानगी प्रक्रिया ऑनलाईन होणार असून, त्यासाठी सल्लागारांची सूचना आवश्यक असेल. शिवाय, इमारतीला परवानगी देखील ऑनलाईन दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं होतं. दरम्यान राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुनील शितपच्या अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई करा अशी मागणी केली होती.
आरोपी सुनील शितपला विक्रोळी न्यायालयाने 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इमारत कोसळून अनेकांचा बळी गेल्याने संतप्त जमाव कायदा हातात घेऊ शकतो यामुळे न्यायालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोपी सुनील शितपने नर्सिंग होमच्या नूतनीकरणावेळी चक्क इमारतीचे पिलर बाजूला काढून त्याठिकाणी लोखंडी रॉड लावले असल्याचा धक्कादायक आरोप रहिवाशांनी केला आहे. मात्र सुनील शितप याने इमारतीच्या मूळ बांधकामात कोणताही बदल नाही. इमारत जुनी झाल्यानं ती धोकादायक अवस्थेत होती असा दावा न्यायालयात केला.
इमारत दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरच्या एलबीएस रोडवर दामोदर पार्क येथे असलेली साईदर्शन ही चार मजली इमारत 25 जुलै रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केलेल्या अनिल मंडल (२८) या सुपरवायझरलाही २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली आहे. तर या प्रकरणी अन्य पाच जणांकडे चौकशी सुरू असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.