मुंबई : राज्यातील शाळांना आणि महाविद्यालयांना आता पुन्हा आपल्या संस्थांमध्ये दूरदर्शन संचाची व्यवस्था करावी लागणार आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाने शारीरिक व्यायाम, कवायती किंवा खेळांमध्ये भाग घेऊन आरोग्य उत्तम राखावे यासाठी संपूर्ण देशात ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर २९ आॅगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शारीरिक तंदुरुस्तीसंदर्भात शपथ देणार असल्याने त्यासाठी पुन्हा राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना यासंदर्भातील आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आले आहेत.
२९ आॅगस्ट रोजी ‘राष्ट्रीय खेळ दिना’चे औचित्य साधून फिट इंडिया मुव्हमेंट कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथून करण्यात येणार आहे. या वेळी ते देणार असलेल्या शपथीचे प्रक्षेपण सकाळी १० वाजता दूरदर्शनवरून संपूर्ण देशात करण्यात येणार आहे. यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शपथ देण्यासंदर्भातील व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. तसेच शपथ घेताना शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित राहतील याची काळजी शाळा, महाविद्यालय प्रशासनाने घ्यावी, असेही निर्देशित करण्यात आले आहे. त्यामुळे महाविद्यालयीन प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांची पुन्हा एकदा दमछाक होणार असल्याची प्रतिक्रिया काही शिक्षकांनी दिली. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांप्रमाणेच नेहरू युवा केंद्रामार्फत व राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी असलेल्या युवकांना शपथ घेण्याच्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मात्र विद्यार्थ्यांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी केवळ शपथ घेऊन उपयोग नाही, तर त्यांना आवश्यक माध्यान्ह भोजनाचा नियमित पुरवठा करणे, त्या योजनांची अंमलबजावणी करणे, सकस आहार, शुद्ध पाणी यांची सोय करणे आवश्यक असल्याचे मत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी व्यक्त केले. शासनाचा फिट इंडिया मुव्हमेंट कार्यक्रम स्तुत्य असला तरी मुंबई वगळता राज्यात सर्वच ठिकाणी त्याचे प्रक्षेपण शाळा, महाविद्यालयांना सुरळीतपणे करता येईलच असे नाही. या पार्श्वभूमीवर शपथीच्या कार्यक्रमाची सक्ती करण्यात येऊ नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
विशेष आर्थिक अनुदान द्यावेफिट इंडिया मुव्हमेंट या कार्यक्रमांतर्गत केवळ एक दिवस धावून अथवा व्याख्यान ऐकून किती काळ फिट राहणार? शालेय विद्यार्थ्यांना क्रीडांगण, क्रीडा साहित्य, अद्ययावत जीम यासाठी अर्थसाहाय्य देण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी विशेष आर्थिक अनुदान देण्यात यावे.- उदय नरे, शिक्षक, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल, अंधेरी.