NCP vs PM Modi, BJP RSS: "मोदींच्या सत्तेची ८ वर्ष कुशासनाची! RSS च्या विचारसरणीने जातीय सलोखा बिघडवला जातोय"; राष्ट्रवादीची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 06:27 PM2022-05-26T18:27:05+5:302022-05-26T18:28:43+5:30
"८ वर्षात देशाने खूप काही गमावले असून देशात धर्म आणि जातीयवादाचे राज्य आहे"
NCP vs PM Modi, BJP RSS: भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कायमच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तशातच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात भाजपाचे अनेक नेते आक्रमक विधानं करताना दिसतात. तर राष्ट्रवादीकडूनही भाजपावर जोरदार टीका केली जाते. मोदी सरकारला नुकतीच ८ वर्षे पूर्ण झाली. त्याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपाच्या केंद्रातील सरकारवर टीकास्त्र सोडलं. इतकंच नव्हे तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ सालापासून सत्तेवर आले. २०१९ ला मोदींना पुन्हा पंतप्रधान पद मिळाले. पंतप्रधानांनी सुशासन करत राष्ट्र चालवावे अशी साऱ्यांचीच अपेक्षा होती. पण पंतप्रधान मोदी यांच्या सत्तेची ८ वर्षे म्हणजे कुशासनाची वर्षे आहे", अशी जहरी टीका महेश तपासे यांनी केली. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीने देशातील जातीय सलोखा बिघडवला जात असल्याचा थेट आरोपही तपासे यांनी केला.
"भाजप सरकारच्या आठ वर्षांमधील आठ अपयशांची देशाला वारंवार आठवण येते. वाढती महागाई, वाढलेली बेरोजगारी, लोकशाहीची दडपशाही, राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यात अपयश, द्वेषाचे राजकारण, रुपयाची ऐतिहासिक घसरण, आर्थिक कुचंबणा, सामाजिक जडणघडणीची झीज ही मोदी सरकारची आठ अपयशांची मालिका आहे. हे अपयश देशवासी कधीच विसरू शकत नाहीत", असा टोला महेश तपासे यांनी लगावला. तसेच, मोदींच्या या ८ वर्षात देशाने खूप काही गमावले असून विज्ञान व समतेऐवजी धर्म आणि जातीयवाद देशावर राज्य करत आहेत, असा आरोपही महेश तपासेंनी केला.