मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर आले असताना त्यांनी ९५६ कोटी रुपयांच्या बहुविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली. त्यात कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि तुर्भे येथील गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलचा समावेश आहे. त्याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन फलाट (प्लॅटफॉर्म) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विस्तारित फलाट क्रमांक १० आणि ११ सुरू करण्यात आले.
कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प ८१३ कोटींचा आहे. या प्रकल्पामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकलच्या वाहतुकीत सुधारणा होईल. दररोज लाखो प्रवाशांना कनेक्टिव्हिटी प्राप्त होईल. रिमॉडेलिंगमुळे अधिक गाड्या हाताळण्यासाठी यार्डची क्षमता वाढेल, गर्दी कमी होईल आणि ट्रेनचा वक्तशीरपणा सुधारेल. तुर्भे येथे गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल प्रकल्प २६.८० कोटींचा आहे. हा प्रकल्प ३२,६२८ चौरस मीटर क्षेत्रफळावर साकारण्यात येईल. या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल. ज्यामध्ये बॅलास्ट साइडिंग लाइनचा १८० मीटर विस्तार करणे, अर्ध्या रेक लांबीच्या नवीन हँडलिंग लाइनची तरतूद, काँक्रीट रेल लेव्हल आयलँड फलाट, काँक्रीट ॲप्रोच रोड आणि ९,७८८ चौरस मीटर पक्क्या स्टॅकिंग क्षेत्राची तरतूद समाविष्ट आहे.
एलटीटी, सीएसएमटी येथे नवीन प्लॅटफॉर्म
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथील ६४ कोटी रुपये खर्चून नवीन (प्लॅटफॉर्म) फलाट उभारण्यात आले आहेत. त्यात कव्हर शेड आणि वॉशेबल ॲप्रनसह ६०० मीटरच्या नवीन पूर्ण लांबीचा फलाट, तसेच सहा मीटर रुंदीचा फूट ओव्हर ब्रीजच्या विस्ताराचा समावेश आहे. अधिक लांबीच्या फलाटांवर जास्त लांबीच्या गाड्या उभ्या राहू शकतात. त्यामुळे प्रत्येक ट्रेनमध्ये अधिक प्रवासी चढू-उतरू शकतील. परिणामी फलाटांवर गर्दी कमी होईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विस्तारित फलाट क्रमांक १० आणि ११ प्रकल्पाची किंमत ५२ कोटी आहे. जूनमध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला. कव्हर शेड आणि वॉशेबल ॲप्रनसह फलाट ३८२ मीटरने वाढविण्यात आले. २४ डब्यांच्या गाड्यांना याचा फायदा होईल.