"मोदी सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यात निष्फळ; आता अमित शाह कुठे आहेत?"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 08:23 PM2023-07-20T20:23:46+5:302023-07-20T20:24:17+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (पवार गट) महिलांचे सरकारविरोधात तीव्र आंदोलन
NCP Woman Wing vs Pm Modi, Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसक जमावाने दोन महिलांना नग्न करून धिंड काढण्याचे क्रूर कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मणिपूर मध्ये गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे. मात्र याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. महिलांविरोधात देशातील मोदी सरकार सुरक्षा देण्यात आणि रक्षण करण्यास अपयशी, निष्फळ ठरले आहे. देशात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, अशा वेळी मोदी सरकार हे महिलांवरती अत्याचार करणारे सरकार आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी विचारला.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात 'बेटी बचाओ, बेटी पढाओ', मात्र मणिपूरमध्ये याउलट होताना दिसत आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांची धिंड काढण्यात आली आहे, मात्र 70 दिवस पहिले झालेल्या या घटनेत अद्यापही ही घटना सोशल मीडियावर समोर येईपर्यंत आणि सर्वोच्च न्यायालयाने यात दखल घेईपर्यंत कुठलेही कारवाई करण्यात आली नव्हती. मणिपूरमध्ये भाजपचे सरकार आहे. या ठिकाणी या दोन महिलांवर अत्याचार झाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात कुठलेही वक्तव्य केले नव्हते. देशांमध्ये महिलावर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढले आहे. भाजपाचे खासदार असलेले ब्रिजभूषण सिंह यांनी देखील कुस्तीपटू महिलेवर लैंगिक अत्याचार केले आहे, मात्र त्यावरदेखील कुठलीही कारवाई अद्याप भारतीय जनता पार्टीने केलेली नाही आहे. महिलांवरती अत्याचार करणारे हे मोदी सरकार आहे का? असा प्रश्न देशातील आणि महाराष्ट्रातील महिलांना पडला आहे," असे प्रसार माध्यमांशी बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या.
देशातील मोदी सरकार हे महिलांवर होत असलेल्या अत्याचार रोखण्यात पूर्णपणे निषफळ ठरलं आहे. मणिपूर हे भरतातील राज्य आहे हे मोदींना लक्षात आहे? मणिपूरमध्ये होत असलेल्या अशा घटनेवेळी गृहमंत्री अमित शाह कुठे आहेत? या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे या आवाज उचलणार आहेत परंतु आम्ही या घटनेच्या निषेधार्थ आज आंदोलन केले, अशी माहिती विद्या चव्हाण यांनी दिली.
"महाराष्ट्रामध्येदेखील मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. मुली बेपत्ता झाल्याच्या घटनेत देखील वाढ झाली आहे, मात्र तरीदेखील सभागृहामध्ये यावर कुणी बोलत नाही. महिलांवरील या घटना कधी थांबणार? असा आम्ही देशातील गृहमंत्री आणि राज्यातील सरकारला प्रश्न विचारत आहोत," असेही त्या म्हणाल्या.