'मोदींनी मला मुख्यमंत्री केलं आणि सर्वांची तोंडं बंद झाली', CM एकनाथ शिंदेंचा सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 04:48 PM2022-07-15T16:48:14+5:302022-07-15T16:49:07+5:30

शिवसेनेसाठी अख्खं आयुष्य खर्ची केलं. मग आम्ही बंडखोर कसे? आमदारांच्या भावना अनेकदा बोलून दाखवल्या पण ऐकून घेतल्या गेल्या नाहीत.

pm Modi made me Chief Minister and everyone get setback says cm Eknath Shinde | 'मोदींनी मला मुख्यमंत्री केलं आणि सर्वांची तोंडं बंद झाली', CM एकनाथ शिंदेंचा सणसणीत टोला

'मोदींनी मला मुख्यमंत्री केलं आणि सर्वांची तोंडं बंद झाली', CM एकनाथ शिंदेंचा सणसणीत टोला

Next

मुंबई-

शिवसेनेसाठी अख्खं आयुष्य खर्ची केलं. मग आम्ही बंडखोर कसे? आमदारांच्या भावना अनेकदा बोलून दाखवल्या पण ऐकून घेतल्या गेल्या नाहीत. सत्तेत असूनही आपला पक्ष चौथ्या क्रमांकावर जात होता हे पाहून काळीज तुटत होतं. मग छातीवर दगड ठेवून शिवसेनेला वाचविण्यासाठी निर्णय घेतला. शिवसैनिकांना वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला आणि त्याला ५० आमदारांनी पाठिंबा दिला, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईत रविंद्र नाट्य मंदिरात आमदार अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात ते बोलत होते. 

"आम्ही उठाव केला आणि बघता बघता ५० आमदार सोबत आले. त्यातल्या एकाही आमदाराला निराश करणार नाही. सर्वांची कामं मार्गी लावणार आहे. काही लोक बोलतात अजूनही मंत्रालय सुरू नाही. पण मी जिथं जातो तिथं मंत्रालय असतं. सर्व कामं मी एका फोनवर करतो. पंतप्रधान मोदींनीही जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांनीही हे शिवसैनिक उठावातून एकत्र आले आहेत. हे दिघे साहेबांच्या तालमीत घडलेले आहेत. यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी मला मुख्यमंत्री केलं. मोदींनी मला मुख्यमंत्री केलं आणि सर्वांची तोंडं बंद झाली", असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

नामांतराचा निर्णय उद्याच घेणार
"औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा याआधीच्या सरकारनं बेकायदेशीरपणे घेतला होता. राज्यपालांच्या बहुमत सिद्ध करण्याच्या पत्रानंतर बेकायदेशीरपणे कॅबिनेट घेऊन निर्णय घेतले होते. हे निर्णय आम्ही उद्याच्या कॅबिनेटमध्ये नव्यानं घेऊ", असं एकनाथ शिंदे म्हणाले.  

५० पैकीही एकही आमदार पडणार नाही
"सूरतला गेल्यानंतर पहिले तीन दिवस मी खरं सांगतो एकही मिनिट झोपलेले नव्हतो. माझ्यासोबत असलेल्या आमदारांना माझी काळजी वाटत होती. पण मला माझ्यासोबत आलेल्या या आमदारांच्या करिअरची काळजी वाटत होती म्हणून मला झोप येत नव्हती. पण बाळासाहेबांच्या आशीर्वादानं सगळं योग्य घडलं. आता मी शब्द दिलाय ५० पैकी एकही आमदार पडणार नाही आणि पडला तर मी राजकारण सोडून देईन", असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

Web Title: pm Modi made me Chief Minister and everyone get setback says cm Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.