शहरभर बॅनर्स आणि कटआऊट्स, मुंबईकरांचे लक्ष वेधून घेणारे होर्डिंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 06:13 AM2023-01-20T06:13:38+5:302023-01-20T06:14:46+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे यांना वाकून नमस्कार करत आहेत, असे होर्डिंग मुंबई ठिकठिकाणी लागले... आणि अवघ्या मुंबईत ते चर्चेचा विषय बनले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने शहरभर मोदींचे रंगीत बॅनर्स, भव्य होर्डिंग्ज, मोठमोठे पोस्टर्स आणि उंच असे कटआऊट लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण मुंबईचे वातावरण मोदीमय झाले होते.
बीकेसी ग्राऊंडवर होणाऱ्या मोदींच्या सभेसाठी दीड लाखांचा जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपकडून खास वांद्रे कुर्ला संकुल येथील मैदानाची जागा निश्चित करण्यात आली. दुपारी दोन वाजल्यापासून वांद्रे कुर्ला संकुल येथील सभास्थळी कार्यकर्ते आणि मुंबईकरांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. खासगी वाहन आणि बेस्ट बसेसच्या साहाय्याने लोक सभास्थळी पोहोचत होते. मोदींच्या आगमन स्थळापासून ते सभा स्थळांपर्यंत जोरदार कटआऊट आणि होर्डिंगबाजी करण्यात आली होती. मुंबई विमानतळ ते वांद्रे कुर्ला संकुलदरम्यान, मुंबई अहमदाबाद महामार्गावर भव्य असे मोदींचे कटआऊट लागण्यात आले होते.
खासगी जाहिरात फलकांवरही मोदीच
महामार्गात खासगी कंपन्यांना जाहिरात करण्यासाठी अनेक ठिकाणी उंच असे जाहिरात कमान आणि डिजिटल फलक उभारण्यात आले आहेत. एरव्ही या फलकावर लाखो रुपयांची चित्रपट किंवा मालिकेची जाहिरात असते. मात्र, गुरुवारी हे फलकही मोदीच्या स्वागत बॅनरने झळकले.
‘मातोश्री’समोर खास कटआऊट!
वांद्रे-कुर्ला संकुलाच्या प्रवेशद्वारावर थेट मातोश्री निवासस्थानासमोर खास करून भव्य असे पंतप्रधान नरेंद्र मोदी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य असे कटआऊट लावण्यात होते. येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात भरावे अशा प्रकारची रचना करून हे कटआऊट उभारण्यात आले होते.
रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांचा प्रत्यक्ष सहभाग!
सभेत मोदींना प्रत्यक्ष पाहता यावे, त्याचे भाषण ऐकता यावे म्हणून शहरातील हिंदीभाषिय रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांनी आपल्या वाहनांवर भाजपाचा मोठा झेंडा लावून प्रत्यक्ष सभेला हजेरी लावली होती. सभास्थळीसुद्धा मोठ्या संख्येने रिक्षा, टॅक्सीचालक वाहन घेऊन आल्याचे दिसत होते. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी स्टॅंडवर वाहनांची गर्दी कमी होती.