PM Modi In Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुक्रवारी (10 फेब्रुवारी) मुंबईत वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर ट्रेन सुरू करण्यात आल्या. तसेच, यानंतर ते मुंबईतील मरोळ भागात दाऊदी बोहरा समुदायाच्या कार्यक्रमाला पोहोचले. यात त्यांनी अल जामिया-तुस-सैफिया (सैफ अकादमी) च्या कॅम्पसचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मी तुमच्या कुटुंबातील सदस्ययावेळी बोलताना पीएम मोदी म्हणाले की, माझी बोहरा समाजाकडे एक तक्रार आहे. तुम्ही कृपया त्यात सुधारणा करावी. तुम्ही मला वारंवार आदरणीय पंतप्रधान म्हणत आहात. पण, मी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य आहे. मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाही. माझे बोहरा समाजाशी चार पिढ्यांपासून संबध आहेत. यावेळी मोदींनी बोहरा समाजाच्या धर्मगुरुंसोबत असलेल्या संबंधांवरही भाष्य केले. तसेच, बोहरा समाजाच्या कामाविषयीही माहिती दिली.
माझा समाजाशी अनेक वर्षांपासून संबंधमोदी पुढे म्हणाले की, माझे भाग्य असे आहे की, मी चार पिढ्यांपासून या समाजाशी जोडलेलो आहे. विकासाच्या बाबतीत बोहरा समाजाने नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे. आज अल्जामिया-तुस-सैफियाह सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार हे त्याच विकासाचे उदाहरण आहे. मला देशाताच नाही तर, परदेशातही बोहरा बांधव भेटायला येतात. बोहरा समाज माझ्यासाठी खूप जवळचा आहे, असेही मोदी म्हणाले.
यापूर्वीही अनेकदा कार्यक्रमात उपस्थितीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही अनेकवेळा बोहरा समाजाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे, मात्र यावेळी हा कार्यक्रम खास आहे. याचे कारण म्हणजे, गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, यापुढे प्रत्येक समाजापर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजापर्यंत पोहोचण्याची भाजपची तयारी म्हणून याकडे पाहिले जात आहे.