"सरस्वती बुद्धी वाटत होती तेव्हा लाईनमध्ये..."; मुंबईत पंतप्रधान मोदींच्या विधानावर टाळ्यांचा कडकडाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 01:54 PM2024-08-30T13:54:09+5:302024-08-30T13:58:43+5:30

मुंबईच्या बीकेसी येथील ग्लोबल फिनटेक फेस्टच्या कार्यक्रमातही पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली होती

PM Modi reply opposition on the progress in technology at Global Fintech Fest | "सरस्वती बुद्धी वाटत होती तेव्हा लाईनमध्ये..."; मुंबईत पंतप्रधान मोदींच्या विधानावर टाळ्यांचा कडकडाट

"सरस्वती बुद्धी वाटत होती तेव्हा लाईनमध्ये..."; मुंबईत पंतप्रधान मोदींच्या विधानावर टाळ्यांचा कडकडाट

PM Modi at Global FinTech Fest: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर आणि मुंबईत विविध प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे. यावेळी मुंबईच्या बीकेसी येथील ग्लोबल फिनटेक फेस्टच्या कार्यक्रमातही पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली होती. यावेळी भाषणादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.  भारतातील फिनटेक क्रांतीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या नेत्यांचा खरपूस समाचार यावेळी पंतप्रधानांनी घेतला. भारतात पायाभूत सुविधा नाहीत असे विरोधक म्हणायचे असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शुक्रवारी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितीतांना संबोधित केले. "भारतातील लोकांनी ज्या गतीने आणि स्केलने फिनटेकचा स्वीकार केला आहे तो इतरत्र कुठेही दिसत नाही. याचे मोठे श्रेय आमच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर-डीपीआयला आणि आमच्या फिनटेक्सलाही जाते. भारतात सणांचा हंगाम आहे. आपण नुकतीच जन्माष्टमी साजरी केली आणि आनंद बघा, आपल्या अर्थव्यवस्थेत आणि आपल्या बाजारपेठेतही उत्सवाचे वातावरण आहे. हा ग्लोबल फिनटेक फेस्ट मुंबईच्या स्वप्नांच्या शहरात या फेस्टिव्ह मोडमध्ये आयोजित करण्यात आला आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

"एक काळ असा होता जेव्हा विदेशातील लोक भारतात आल्यावर सांस्कृतिक विविधता पाहून हैराण होत असत. पण आता जेव्हा ते भारतात येतात तेव्हा फिनटेक विविधता पाहूनही हैराण होतात. विमानतळावर उतरल्यापासून ते स्ट्रीट शॉपिंग करेपर्यंत सर्व ठिकाणी फिनटेकचा बोलबाला दिसून येतो. करन्सी ते क्युआर कोड अशी फिनटेक क्रांती भारताने केली," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

"तुम्हाला आठवत असेल की काही लोक संसदेत उभे राहून प्रश्न विचारत असत आणि जे लोक स्वतःला विद्वान समजत होते ते त्या वेळी प्रश्न विचारत होते. पण जेव्हा सरस्वती बुद्धी वाटत होती, तेव्हा तेच आधी वाटेत उभे होते. ते विचारायचे की भारतात बँकेच्या शाखा नाहीत, प्रत्येक गावात बँका नाहीत, इंटरनेट नाही, त्यांनी असेही विचारले की वीज नसेल तर रिचार्जिंग कसे होणार? फिनटेक क्रांती कशी होणार? माझ्यासारख्या चहावाल्याला विचारले जायचे. पण आज बघा एका दशकातच भारतात ब्रॉड बँण्ड युजर्स हे ६ कोटींवरुन ९४ कोटींवर पोहोचले आहेत," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

"गेल्या १० वर्षांत फिनटेक स्पेसमध्ये ३१ बिलियन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे. आमचे फिनटेक स्टार्टअप १० वर्षांत ५०० टक्क्यांनी वाढले आहेत. स्वस्त मोबाईल फोन, स्वस्त डेटा आणि झिरो बॅलन्स जन धन बँक खात्यांनी भारतात चमत्कार घडवले आहेत," असं मोदींनी म्हटलं.

Web Title: PM Modi reply opposition on the progress in technology at Global Fintech Fest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.