Join us

'पीएम मोदींनी जरांगेंशी संवाद साधायला हवा, आरक्षण देणं केंद्राच्या हातात'; संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 10:37 AM

मराठा आरक्षण देणं केंद्र सरकाच्या हातात आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे -पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अगोदर राज्य सरकारला आरक्षणाच्या निर्णयासाठी ४० दिवसांचा वेळ दिला होता, या वेळेत सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. यामुळे आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या असून, काल मुंबईत आरक्षण संदर्भात सर्वपक्षीय बैठकही झाली. दरम्यान, आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकावर टीका केली. 

मराठा आंदोलन अपडेट: जरांगे पाटलांनी रात्रीपासून पाणी सोडले; सरकारचे शिष्टमंडळ भेटीला जाणार

खासदार संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरुन संवाद साधायला हवा, मराठा आरक्षण देणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे, असं वक्तव्य खासदार राऊत यांनी केलं. देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत ते काही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासाठी गेलेले नाही. ते स्वत:च्या खुर्च्या वाचवण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यांना महाराष्ट्राची चिंता नाही, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.  

"मराठा आरक्षणासाठी किती वेळ हवा आहे याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना द्यावं. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावं ते देणं केंद्र सरकारच्या हातात आहे, पण नरेंद्र मोदी प्रचारात गुंतले आहेत. अमित शाह छत्तीसगढ पासून मिझोरामपर्यंत फिरत आहेत. इकडे महाराष्ट्र्र्र पेटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवर बोलायला पाहिजे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. 

राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला महाराष्ट्र काही पडलेलं नाही, देवेंद्र फडणवीस स्वत:च्या खुर्च्या वाचवण्यासाठी दिल्लीला गेले आहेत, असंही संजय राऊत म्हणाले. 

सरकारचे शिष्टमंडळ भेटीला जाणार

काल दुपारपासून मराठा आंदोलनाची सर्वाधिक झळ बसलेल्या जिल्ह्यांत संचारबंदीसह इंटरनेट बंदी करण्यात आली आहे. यामुळे या भागातील फारशा अपडेट महाराष्ट्रात येत नाहीएत. अशातच आज दोन मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. यामध्ये जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे रात्रपासून पाणी सोडले आहे. 

दुसरीकडे कालच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगे पाटलांनी उपोषण थांबवावे असे आवाहन करण्यात आले होते. यावर जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला यावे, मराठा त्यांना संरक्षण देतील असे म्हटले होते. परंतू, आज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी कोणताही राजकीय नेता नाही तर सरकारचे शिष्टमंडळ जाणार आहे. 

भाजप विरोधकांवर कारवाई करत आहे

"भाजप आता भारतातील प्रत्येक विरोधकांवर अशी कारवाई करत आहे. भाजपने ठरवलं तर सर्व विरोधकांना कारवाईत खेचतील,पण फक्त हे २०२४ पर्यंत, त्यानंतर बघू. ह्या सरकार मध्येच किती लोक आहेत की ज्यांना जेल मध्ये टाकलं पाहिजे, असा आरोपही राऊत यांनी केला.

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदी