Join us

मोदी मुंबईत येणार; पण मुख्यमंत्री स्वागताला नाही जाणार; 'त्या' निमंत्रणपत्रिकेवरून वाद पेटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 3:39 PM

मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी बऱ्याच कालावधीनंतर एकाच व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा होती

मुंबई: स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावानं दिला जाणारा पहिलावहिला पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार आहेत. या सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बऱ्याच कालवधीनंतर एकाच मंचावर दिसतील अशी चर्चा होती. मात्र मुख्यमंत्री ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सोहळ्यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचं नावच नसल्याची माहिती पुढे आली आहे.

मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून कलाक्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा सन्मान केला जातो. यंदाच्या वर्षापासून लता मंगेशकर यांच्या नावानं पुरस्कार दिला जाणार आहे. लता मंगेशकरांच्या नावे दिला जाणारा पहिलावहिला पुरस्कार पंतप्रधान मोदींना जाहीर झाला आहे. त्यासाठी थोड्याच वेळात मोदी मुंबईत दाखल होतील. मुख्यमंत्री ठाकरे मोदींच्या स्वागताला विमानतळावर जाणार नाहीत. त्यांच्या जागी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे विमानतळावर जाणार असल्याची चर्चा होती. मात्र आता आदित्यदेखील विमानतळावर जाणार नसल्याचं कळतं. त्यांच्याऐवजी मंत्री सुभाष देसाई आणि अदिती तटकरे विमानतळावर जाणार असल्याचं वृत्त टीव्ही९ दिलं आहे.

मास्टर दिनानाथ प्रतिष्ठान आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचं वितरण आज संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात होईल. संध्याकाळी ५ वाजता सोहळा संपन्न होणार आहे. त्यासाठी मोदी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल होतील. पंतप्रधान ज्या राज्यात जातात, त्या राज्याचे मुख्यमंत्री स्वागतासाठी जातात. तसा प्रोटोकॉल आहे. मात्र ठाकरे मोदींच्या स्वागताला जाणार नसल्याचं समजतं.

टॅग्स :नरेंद्र मोदीउद्धव ठाकरेआदित्य ठाकरेअदिती तटकरेसुभाष देसाई