शरद पवारांच्या निमंत्रणावरुन PM मोदी महाराष्ट्रात येणार, पवारांनीच सांगितली तारीख
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 08:25 PM2023-06-29T20:25:22+5:302023-06-29T20:45:21+5:30
मोदींचा हा विरोध व्यक्तीगत नसून राजकीय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई - परदेशी दौऱ्यावरून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना त्यांच्या एकजुटीवरून लक्ष्य केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षातील घराणेशाही आणि घोटाळ्यांचे आरोप यावरून मोदींनी पवारांवर टीका केली होती. या टीकेला पवारांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले. "पंतप्रधान यांनी माझ्या पक्षाबद्दल मत व्यक्त केले. पण माझी मुलगी स्वत:च्या कर्तुत्वाने आहे. ती लोकांमधून निवडून आली असून संसदेत तिचे काम उच्च दर्जाचे आहे", अशा शब्दांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले. तर, मोदींचा हा विरोध व्यक्तीगत नसून राजकीय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी घराणेशाहीवरून विरोधकांवर टीका केली होती. "सुप्रिया सुळे यांचे भले करायचे असेल तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मतदान करा", असा उपरोधिक टोला मोदींनी लगावला होता. यावर बोलताना पवारांनी ही व्यक्तीगत टीका नसून राजकीय असल्याचे एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले. तसेच, मोदी एका कार्यक्रमासाठी १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात येत आहेत हेही त्यांनी सांगितले. विशेष, म्हणजे त्या कार्यक्रमासाठीच मी पुढाकार घेऊन मोदींना निमंत्रण दिलं होतं, जे त्यांनी स्वीकारलं आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोदींचा विरोध हा व्यक्तीगत असायचं काहीच कारण नाही, हे राजकीय आहे. एका गोष्टीसाठी मी मोदींना फोन केला. रोहित टिळक हे माझ्याकडे आले होते, १ ऑगस्ट रोजी इथं लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त एक कार्यक्रम असतो. त्यासाठी, मोदींना बोलावण्याची त्यांची इच्छा होती, पण त्यांचा अॅप्रोच होत नव्हता. म्हणून, ते माझ्याकडे आले होते. मग, मी मोदींना फोन केला, त्यांना विनंती केली आणि त्यांनीही ती विनंती स्वीकारली. त्यामुळे, १ ऑगस्ट रोजी ते इथे येणार आहेत, असं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं. पण, आता त्यांचं मत बदललं असलं तर माहिती नाही. पण, त्यांनी हे निमंत्रण स्वीकारलेलं असून ते १ ऑगस्ट रोजी येत आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.
मोदी आणि माझे व्यक्तीगत मतभेद असायचं काहीच कारण नाही, पण बिहारमध्ये आम्ही जी बैठक घेतली, राजकीय विरोधी पक्ष एकत्र आले. त्याची ही अस्वस्थता आहे, असे म्हणत शरद पवारांनी मोदींच्या विरोधावर भाष्य केलं.
सुप्रिया सुळेंवरील टीकेला दिलं पवारांनी उत्तर
माझ्या पक्षाबद्दलही प्रधानमंत्र्यांनी मत व्यक्त केले आहे. मुलीला प्रोत्साहित करायचे असेल तर राष्ट्रवादीला मत द्या, असे त्यांनी सांगितले. माझी मुलगी तीन वेळा पार्लमेंटमध्ये निवडून आली आहे. एखाद्या वेळी बापजाद्यांची पुण्याई उपयोगी ठरते. पण दुसऱ्या, तिसऱ्या निवडणुकीत यश मिळणे, त्यानंतर पार्लमेंटच्या कामगिरीत उच्च दर्जाचा क्रमांक ठेवणे, तिला आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. मोदी साहेबांनी काहीही सांगितले तरी स्वत:चे कर्तृत्व असल्याशिवाय देशातील मतदार नेहमीच मतं देत नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांनी असे वक्तव्य करणे अशोभनीय आहे. संसदेच्या सदस्याबद्दल असे मत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त करणे योग्य नाही. ही पदे या सर्व संस्था आहेत. या संस्थेची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. जे या संस्था सांभाळतात त्यांनी संसदेतील सदस्य हे देखील एक संस्थात्मक पद आहे याचे भान ठेवून त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. राज्यातील चित्र पाहिल्यानंतर जे अस्वस्थ आहेत तेच अशाप्रकारचे हल्ले करतात.