संजय शर्मा नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जास्तीत जास्त सभा घेण्याचा विक्रम करण्याची शक्यता आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या सभांच्या तुलनेत ते यावर्षी अधिक सभा घेण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच पंतप्रधान मोदी यांचे दौरे सुरू झाले आणि ते ३० मेपर्यंत चालतील. यादरम्यान, त्यांच्या जवळपास १८० सभा, ३० रोड शोसह २०० पेक्षा अधिक कार्यक्रम होणार आहेत.
गतनिवडणुकीत २०१९ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी जवळपास १४५ सभांना संबोधित केले होते. या निवडणुकीत ते हा रेकॉर्ड लवकरच तोडतील. कारण, उमेदवारांकडून मोदी यांच्या सभांना सर्वाधिक मागणी आहे. स्वत: पंतप्रधानांचीही अशी इच्छा आहे की, अधिकाधिक लोकसभा मतदारसंघांत त्यांचा किमान एक कार्यक्रम व्हावा. केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही रोज निवडणूक सभा घेत आहेत. पण, मागणी केवळ मोदी यांचीच आहे. भाजपच नाही तर त्यांच्या मित्र पक्षांनाही निवडणूक जिंकण्यासाठी मोदी यांच्या सभा हव्या आहेत.
पंतप्रधानांची रामटेक मतदारसंघात आज सभामहायुतीसाठी प्रतिष्ठेची जागा असलेल्या रामटेक मतदारसंघात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर येथील सभेनंतर दोनच दिवसांत ही सभा होत असून, यातून मोदी कुणाला टार्गेट करणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.