Join us

पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, साडेचार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 5:48 AM

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सभास्थळाची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा ९०० अधिकाऱ्यांसह साडेचार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. तसेच, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात १९ जानेवारी रोजी २४ तासांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. पोलिसांनी या भागात ड्रोन, पॅराग्लायडर आणि रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे, नरेंद्र मोदी यांच्या मार्गादरम्यान कडेकोट सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९०० अधिकाऱ्यांसह ३५६२ पोलिस कर्मचारी तैनात आहेत, तसेच मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले जाणार आहे. सायबर पोलिस सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे, मुंबई पोलिसांच्या दिमतीला बॉम्बशोधक व नाशक पथक, राज्य दहशतवादविरोधी पथक, जलद प्रतिसाद पथकासह, राज्य राखीव बल विविध यंत्रणा तैनात असणार आहे.

या मार्गावर वाहतूक संथ गतीने...

बीकेसी आणि गुंदवली मेट्रो स्थानक येथील कार्यक्रमामुळे गुरुवारी दुपारी ४:१५ ते ५:३० या वेळेत पश्चिम द्रुतगती मार्गावर दक्षिण वाहिनी (कुलाबाकडे), तसेच सायंकाळी ५:३० - ५:४५ या वेळेत उत्तरवाहिनी (दहिसरकडे) वाहतूक संथ गतीने सुरू असेल. दुपारी १२.०० ते रात्री नऊ या कालावधीत पश्चिम द्रुतगती महामार्ग व सर्व रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल. 

हेल्पलाइन क्रमांक- वाहतूक विभागाच्या अधिकृत माध्यमांवरून मिळालेली माहितीच प्रमाण मानावी. कोणतीही शंका असल्यास हेल्पलाइन क्रमांक वा ट्विटरवर संपर्क साधण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :नरेंद्र मोदीमुंबईदेवेंद्र फडणवीस