Join us  

फॉक्सकॉनपेक्षा तोडीस-तोड...! मोदींचा एकनाथ शिंदेंना शब्द; फोनवर झाली महत्वाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 2:24 PM

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील सदर प्रकरणावर एक महत्वाची माहिती दिली आहे.

मुंबई- वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातून १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा (vedanta semiconductor) हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. 

महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर २६ जुलै २०२२ रोजी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कंपनीबरोबर या प्रकल्पाबाबत चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर मंगळवारी कंपनीने अचानक हा प्रकल्प गुजरातला होणार असल्याचे जाहीर केले. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना लक्ष्य करत आहेत. 

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून थेट गुजरातला; कंपनीच्या चेअरमन यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील सदर प्रकरणावर एक महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिला जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं. तसेच महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असं नरेंद्र मोदींनी फोनवर म्हटल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. 

शिवसेना-भाजप युतीचे नवे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील ११०० एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

गुजरातनं फॉक्सकॉनला काय दिलं?, महाराष्ट्र इथे मागे पडला, नाहीतर ऑफर काही कमी नव्हती!

दरम्यान, एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार, सदर प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील तळेगावची साईट योग्य असल्याचा उल्लेख वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालमध्ये नमूद करण्यात आला आहे. तर  गुजरातमधील 'ढोलेरा'ची साईट प्रकल्पासाठी अयोग्य असल्याचाही उल्लेख या अहवालामध्ये आहे. वेदांता-फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाबाबत एक सर्व्हे केला होता. त्यावेळी त्यांनी जागेबाबत निरिक्षण करुन अहवाल सादर केला होता. त्यामध्ये सदर प्रकल्पाबाबत मत मांडलं होतं. 

टॅग्स :वेदांता-फॉक्सकॉन डीलनरेंद्र मोदीमहाराष्ट्रगुजरातमहाराष्ट्र सरकारएकनाथ शिंदे