Join us

लतादीदींच्या नावाचा पुरस्कार सर्व देशवासियांना समर्पित, हा पुरस्कार मिळणं सौभाग्य : पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 9:52 PM

राहुल देशपांडे यांना भारतीय संगीत सेवेकरता मा. दीनानाथ पुरस्कार, आशा पारेख यांना चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवेकरता मा. दीनानाथ विशेष पुरस्कार देण्यात आला.

मुंबई : “माझी थोरली बहीण असलेल्या लतादीदीच्ंया नावे दिला जाणारा पहिला पुरस्कार मला देण्यात आला हे मी माझे सौभाग्य मानतो. संपूर्ण देशाच्या असलेल्या दीदींचा हा पुरस्कार सर्व देशवासियांना समर्पित करतो,” असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या ८० व्या पुण्यतिथी निमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात बोलताना मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना सुरुवातीला मोदींनी पं. हृदयनाथ मंगेशकर यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक होवो अशी इच्छा व्यक्त केली. “स्व. संगीतकार सुधीर फडके यांनी मंगेशकर कुटुंबियांशी माझी पहिली ओळख करून दिली. त्यानंतर आमचे ऋणानुबंध इतके दृढ झाले की, लतादीदींशी माझे बंधुत्वचे नाते जोडले गेले. आज त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळत असल्याचा आनंद असला तरी पुढच्या रक्षाबंधन दिवशी राखी बांधण्यासाठी दीदी नसतील याचे दु:ख आहे. मी पुरस्कार स्वीकारत नाही, पण हा पुरस्कार माझ्या थोरल्या बहिणीच्या नावे असल्याने नाकारू शकलो नाही. दीदी सर्वांच्या होत्या तसाच हा पुरस्कारही सर्वांचा आहे. दीदींच्या ८० वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासातील त्यांची गाणी ग्रामोफोनच्या जमान्यापासून आजच्या अँपच्या काळापर्यंत सर्वांना आनंददायी अनुभव देत आहेत,” असे मोदी म्हणाले.

यासोबतच गायक राहुल देशपांडे यांना भारतीय संगीत सेवेकरता मा. दीनानाथ पुरस्कार, आशा पारेख यांना चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवेकरता मा. दीनानाथ विशेष पुरस्कार, जॅकी श्रॉफ यांना चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवेकरता मा. दीनानाथ विशेष पुरस्कार, मुंबईच्या डबेवाल्यांच्या नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टला समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवेकरता (उल्हास मुके) मा. दीनानाथ आनंदमयी पुरस्कार आणि 'संज्या छाया' या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार (दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी) यांना प्रदान करण्यात आले. 

राहुल देशपांडेंनी व्यक्त केल्या भावनामा. दीनानाथ पुरस्कार म्हणजे माझे आजोबा वसंतराव देशपांडे यांचा आशीर्वाद असल्याची भावना राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली. तिघी मंगेशकर भगिनींच्या गाण्यांनी आपल्याला स्टार बनवल्याचे आशा पारेख म्हणाल्या. 'संज्या छाया' या नाटकाला मिळालेला पुरस्कार संपूर्ण टीमचा असल्याचे चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले. आपल्याला मिळालेला पुरस्कार म्हणजे १३२ वर्षांपासून डबेवाले करत असलेल्या सेवेचा गौरव असून हा पुरस्कार त्यांना समर्पित असल्याचे मत उल्हास मुके यांनी व्यक्त केले. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा खूप मोठा फॅन असून, या पुरस्काराने जबाबदारी वाढवल्याची भावना जॅकी श्रॉफ यांनी आपल्या अनोख्या शैलीत व्यक्त केली.

मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला राज्यपाल भगतसिंग कोशारी, आशा पारेख, जॅकी श्रॉफ, राहुल देशपांडे, देवेंद्र फडणवीस, सुभाष देसाई, नितीन मुकेश, निल नितीन मुकेश, दया शेट्टी, उदित नारायण, हरिहरन, रूप कुमार राठोड आदी अमन्यवर उपस्थित होते. प्रकृती ठीक नसल्याने रुग्णालयात उपचार घेत असल्याने पं. हृदयनाथ मंगेशकर या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. हरिश भिमानी यांनी या कार्यक्रमाचं सूत्र संचालन केलं. जॅकी श्रॉफ यांनी 'नैन से नैन...' हे गाणं गात सोहळ्यात रंग भरले. पुरस्कार सोहळ्यानंतर स्वरलतांजली हा सुधुर गाण्याचा कार्यक्रम झाला.

टॅग्स :लता मंगेशकरराहुल देशपांडेनरेंद्र मोदी