“माझी थोरली बहीण असलेल्या लतादीदीच्ंया नावे दिला जाणारा पहिला पुरस्कार मला देण्यात आला हे मी माझे सौभाग्य मानतो. संपूर्ण देशाच्या असलेल्या दीदींचा हा पुरस्कार सर्व देशवासियांना समर्पित करतो,” असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या ८० व्या पुण्यतिथी निमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात पंतप्रधानांना सन्मानित करण्यात आलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.
“पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि देशात प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असलेले एकमेव नेते शरद पवार यांच्याशीही गानसम्राज्ञी लतादीदी यांचे तेवढेच जिव्हाळ्याचे संबंध होते,” असं रोहित पवार म्हणाले.
यासोबतच गायक राहुल देशपांडे यांना भारतीय संगीत सेवेकरता मा. दीनानाथ पुरस्कार, आशा पारेख यांना चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवेकरता मा. दीनानाथ विशेष पुरस्कार, जॅकी श्रॉफ यांना चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवेकरता मा. दीनानाथ विशेष पुरस्कार, मुंबईच्या डबेवाल्यांच्या नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टला समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवेकरता (उल्हास मुके) मा. दीनानाथ आनंदमयी पुरस्कार आणि 'संज्या छाया' या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार (दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी) यांना प्रदान करण्यात आले.