मोदींचं 'मिशन महाराष्ट्र'; भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंना म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 02:04 PM2019-09-07T14:04:15+5:302019-09-07T20:58:23+5:30

दोन शब्दांत उद्धव ठाकरेंचा खास उल्लेख

pm narendra modi calls shiv sena chief uddhav thackeray small brother | मोदींचं 'मिशन महाराष्ट्र'; भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंना म्हणाले...

मोदींचं 'मिशन महाराष्ट्र'; भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंना म्हणाले...

Next

मुंबई: मेट्रोच्या तीन मार्गिकांचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमीपूजन केलं. या माध्यमातून मोदींनी मिशन महाराष्ट्रचा श्रीगणेशा केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांचं तोंडभरुन कौतुक केलं. मोदीजी, किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करू, असं म्हणत उद्धव यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. 

उद्धव ठाकरे यांनी काश्मीरमधून कलम 370 हटवल्याबद्दल पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. कलम 370 रद्द झालं; याचा आम्हाला अभिमान आहे. काश्मीर हा आपला अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. मोदी यांच्या रूपाने देशाला दिशा देणारं नेतृत्त्व मिळालं आहे. मुंबईला सुविधा देत आहात याचा आनंद आहे. राज्यात युतीचे सरकार येणार याची खात्री आहे. आम्हाला सत्तेचा हव्यास नाही. तर राज्याचा विकास करण्यासाठी सत्ता हवीय,' असं  उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. यानंतर बोलताना मोदींनी उद्धव यांचा उल्लेख लहान भाऊ असा केला. 

पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात मेट्रोमुळे मुंबईकरांना होणाऱ्या फायद्यांवर भाष्य केलं. मेट्रोमुळे मुंबई आता काही मिनिटांमध्ये फिरता येईल. त्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचेल. सध्या मुंबईत 11 किमीचा मेट्रो मार्ग आहे. लवकरच या मार्गाची लांबी 325 किमीवर जाईल. गेल्या 5 वर्षात देशात मेट्रोच्या 400 किमी लांबीच्या मार्गिकांचं काम झालं. देशातील एकूण मेट्रो मार्गिकांपैकी निम्म्या मार्गिकांचं काम गेल्या 5 वर्षांत झालं आहे, असं मोदी म्हणाले. 

उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी मेक इन इंडियाचा प्राधान्यानं उल्लेख केला. मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीचं काम मेक इन इंडियाच्या अंतर्गत होईल. त्यामुळे मेट्रोचे डबे आपल्याला आयात करावे लागणार नाहीत, असं मोदी म्हणाले. लोकलमधून जितके प्रवासी करतात, तितकेच मेट्रोतून करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर सरकारचा भर असून तब्बल 100 लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात येणार आहेत. लवकरच एक देश-एक तिकीट योजना देशात सुरू होईल, असंदेखील मोदी म्हणाले. 
 

Web Title: pm narendra modi calls shiv sena chief uddhav thackeray small brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.