Join us

मुंबईत मोदी-बाळासाहेबांच्या 'त्या' पोस्टर्सची चर्चा; पण, नेमके कुणी लावले? 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 11:06 AM

मुंबईत लावण्यात आलेले काही पोस्टर्स मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत 38 हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज दुपारी 4 वाजता मोदी यांची सभा पार पडणार आहे.  भाजप आणि शिंदे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जबरदस्त तयारी केली आहे. दरम्यान, मुंबईत लावण्यात आलेले काही पोस्टर्स मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम वाजण्यापूर्वी नरेंद्र मोदींचा आजचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहेत. त्यामुळेच शिवसेनेच्या (ठाकरे गट) बालेकिल्ल्यात गिरगाव आणि मरीन लाइन्स येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर झुकलेले दिसत आहे. हे पोस्टर मुंबईतील अनेक भागात लावण्यात आले आहेत. त्यामुळे या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

नरेंद्र मोदींच्या आजच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र, नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पोस्टरवर कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे हे पोस्टर्स नेमके कुणी लावले असा प्रश्न पडला असून याकडे सर्वच मुंबईकरांचे लक्ष जात आहे. दरम्यान, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच, अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

टॅग्स :नरेंद्र मोदीमुंबईबाळासाहेब ठाकरे