पंतप्रधान मोदींच्या हस्ते एकूण 3 मेट्रो मार्गिकांचं भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 02:48 PM2019-09-07T14:48:17+5:302019-09-07T14:55:11+5:30

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजनाचा धडाका

PM narendra Modi lays foundation stone for three metro lines in Mumbai | पंतप्रधान मोदींच्या हस्ते एकूण 3 मेट्रो मार्गिकांचं भूमिपूजन

पंतप्रधान मोदींच्या हस्ते एकूण 3 मेट्रो मार्गिकांचं भूमिपूजन

Next

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी वांद्रे-कुर्ला संकुलात तीन मेट्रो मार्गांची पायाभरणी करण्यात आली. या तीन मार्गांमुळे शहरातील मेट्रोचे जाळे 42 किलोमीटरने वाढणार आहे. यामध्ये गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) हा मेट्रो-10 वरील 9.2 किलोमीटर मार्ग, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मेट्रो-11 वरील 12.7 किलोमीटरचा मार्ग आणि कल्याण ते तळोजा हा मेट्रो-12 वरील 20.7 किलोमीटरचा मार्ग समाविष्ट आहे.

पंतप्रधान यांनी अद्ययावत मेट्रो भवनचे भूमीपूजनही केले. ही 32 मजली इमारत असून 340 किलोमीटर अंतराच्या 14 मेट्रो मार्गांचे परिचालन आणि नियंत्रण करेल. पंतप्रधान यांनी कांदिवली पूर्व इथल्या बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्‌घाटन केले. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पहिल्या मेट्रो डब्याचे उद्‌घाटन त्यांनी केले. महामुंबई मेट्रोसाठी ब्रॅण्ड व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन पंतप्रधान यांनी केले.

सरकारने मुंबई आणि आसपासच्या परिसरातल्या प्रवाशांना दिलासा देण्याच्या उद्देशाने येत्या 4 ते 5 वर्षात 337 किलोमीटर लांबीचे मेट्रो रेल्वेचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी दहिसर ते डीएन नगर- 2A कॉरिडॉर, डीएन नगर ते मंडाले मेट्रो-2 B कॉरिडॉर, कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 कॉरिडॉर, वडाळा ते कासारवडवली मेट्रो-4 कॉरिडॉर, स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो-6 कॉरिडॉर आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो-7 कॉरिडॉर या सहा मार्गिकांचे काम सुरु झाले आहे. या 139 किलोमीटर लांबीच्या मेट्रो रेल्वेमुळे दररोज 50 लाख प्रवाशांना प्रवास करता येईल.

या व्यतिरिक्त गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) हा मेट्रो-10 वरील 9.2 किलोमीटर मार्ग, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मेट्रो-11 वरील 12.7 किलोमीटर मार्ग आणि कल्याण ते तळोजा हा मेट्रो-12 वरील 20.7 किलोमीटरचा मार्ग अशा 42.6 किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम आता हाती घेतले जाणार आहे. या मेट्रो मार्गांमुळे इंधन आणि वेळेची बचत होईल तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल.

गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो-10 कॉरिडॉर
9.2 किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेवर 4 उन्नत स्थानकं असतील
मोघरपाडा इथे कार डेपो
गायमुख (मेट्रो-4 A) आणि दहिसर (मेट्रो-9) येथे मार्ग बदलता येणे शक्य
दररोज प्रवास करणाऱ्यांची अपेक्षित संख्या- 2031 मध्ये 21.62 लाख

वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो-11 कॅरिडॉर
12.8 किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेवर 10 स्थानकं (8 भूमीगत, 2 उन्नत)
मोघरपाडा/आणिक बस आगार येथे कार डेपो
सीएसएमटी, सीएसएमटी (मेट्रो-3), शिवडी (हार्बर रेल्वे), वडाळा (मेट्रो-4) आणि भक्ती पार्क (मोनो रेल) येथे मार्ग बदलणे शक्य
दररोज प्रवास करणाऱ्यांची अपेक्षित संख्या- 2031 मध्ये 16.90 लाख

कल्याण ते तळोजा मेट्रो-12 कॅरिडॉर
20.7 किलोमीटरची ही मार्गिका पूर्णपणे उन्नत असून त्यावर 17 स्थानकं असतील
पिसावे येथे कार डेपो
एपीएमसी मार्केट, कल्याण (मेट्रो-5) येथे मार्ग बदलणे शक्य

दररोज प्रवास करणाऱ्यांची अपेक्षित संख्या- 2031 मध्ये 2.6 लाख

मेट्रो भवन
हरित भवन वैशिष्ट्यासह अद्ययावत परिचालन नियंत्रण केंद्र
हे 32 मजली केंद्र 337 किलोमीटर 14 मेट्रो मार्गांचे परिचालन आणि नियंत्रण करेल
20,387 चौरस मीटर भूखंडावर हे बांधण्यात येईल
1,14,088 चौरस मीटर बांधकाम योग्य क्षेत्र
यापैकी 24,293 चौरस मीटर परिचालन नियंत्रण केंद्रासाठी राखीव
9,624 चौरस मीटर मेट्रो प्रशिक्षण संस्थेसाठी
80,171 चौरस मीटर मेट्रोसंबंधी तांत्रिक कार्यालयांसाठी
कार्यादेश तारखेपासून 36 महिन्यात प्रकल्प पूर्ण केला जाणार

बाणडोंगरी मेट्रो स्थानक
ऊर्जा कार्यक्षम एलिव्हेटर्स, एस्केलेटर्स, सौर ऊर्जेचा वापर असलेले एलईडी दिवे
दिव्यांग प्रवाशांसाठी लिफ्टमध्ये ब्रेल बटन
ऑटोमॅटिक रिस्क्यू डिव्हाईस आणि आपत्कालीन परिचालनासारखी विशेष वैशिष्ट्य
सार्वजनिक माहितीसाठी डिस्प्ले, घड्याळं, पेयजल
फायर डिटेक्टर्स आणि सप्रेसर्स उपलब्ध असतील
चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सिंक्रोनाइज प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स
50 कॅमेऱ्यांसह सीसीटीव्ही देखरेख यंत्रणा, अनोळखी वस्तूंचा शोध घेणारी यंत्रणा

नवीन मेट्रो डबा
मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत पहिला मेट्रो डबा
अद्ययावत डब्याची निर्मिती विक्रमी वेळेत-365 च्या तुलनेत 75 दिवस
नियमित डब्याची सर्व वैशिष्ट्य यात समाविष्ट-एका डब्यात सुमारे 350 प्रवाशांची क्षमता
डब्याची रुंदी 3.2 मीटर, उंची 3.9 मीटर आणि लांबी 22.6 मीटर
दिव्यांगांसाठी अनुकूल, डब्याचे आर्युमान 35 वर्षे, आवाज करत नाही
सायकली अडकवण्यासाठी विशेष जागा
प्रवासी भागात स्मार्ट प्रकाश योजनेसह स्वयंचलित तापमान नियंत्रण
डिझाईन स्पीड ताशी 90 किलोमीटर, परिचालन वेग ताशी 80 किलोमीटर
स्वयंचलित देखरेख, दार उघडणे बंद होणे, उष्णता, धूर आणि आग शोधक
व्हिडीओद्वारे देखरेख
2 गाड्यांचे परिचालक, प्रवासी, परिचालन नियंत्रण केंद्र यांच्यात संपर्क शक्य
 

Web Title: PM narendra Modi lays foundation stone for three metro lines in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.