Join us

'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, शालिनी ठाकरे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 1:59 PM

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी विवेक ओबेरॉय याची प्रमुख भूमिका असलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतला आहे.

ठळक मुद्देमनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी विवेक ओबेरॉय याची प्रमुख भूमिका असलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचं पालन सर्वांनी करावं, असं अपेक्षित असताना सत्ताधारी पक्षच जर आचारसंहितेला असा पायदळी तुडवणार असेल तर हा गैरप्रकार रोखण्यासाठी मनसेलाच खळ्ळ-खटॅक करावं लागेल.समाजातील किंवा सिनेक्षेत्रातील प्रतिष्ठीत लोक मोदी यांच्यावरील चित्रपटांसाठी आपलं योगदान देत आहेत, असा एक समज या चित्रपटाच्या 'पडद्यामागील' लोकांना जाणीवपूर्वक पसरवायचा आहे.

मुंबई - मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी विवेक ओबेरॉय याची प्रमुख भूमिका असलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतला आहे. शालिनी ठाकरे यांनी 'गेल्या वर्षीच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदी-भाजपा सरकारने सरकारी योजनांच्या प्रचारासाठी अक्षय कुमारच्या टॉयलेट एक प्रेमकथा आणि पॅडमॅन या दोन चित्रपटांना पक्षामार्फत निधी उपलब्ध करून दिल्याचा आरोप केला होता. या घटनेला एक वर्ष उलटत नाही तोच आणखी एक मोठा 'पराक्रम' भाजपवाल्यांनी करून दाखवला आहे" असं म्हटलं आहे. 

'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटातील गाणी गीतकार जावेद अख्तर आणि समीर यांनी लिहिल्याचं जाहीर करण्यात आलं. तसेच चित्रपटाच्या अधिकृत पोस्टरवर त्यांचा नावाचा तसा उल्लेखही करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र, जावेद अख्तर आणि समीर या दोघांनीही या चित्रपटासाठी गीतलेखन केलेलं नाही. तसं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे, असंही शालिनी ठाकरे यांनी सांगितलं आहे. 

समाजातील किंवा सिनेक्षेत्रातील प्रतिष्ठीत लोक मोदी यांच्यावरील चित्रपटांसाठी आपलं योगदान देत आहेत, असा एक समज या चित्रपटाच्या 'पडद्यामागील' लोकांना जाणीवपूर्वक पसरवायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना या गलिच्छ प्रचाराचा जाहीर निषेध करत असल्याचं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. 5 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचं पालन सर्वांनी करावं, असं अपेक्षित असताना सत्ताधारी पक्षच जर आचारसंहितेला असा पायदळी तुडवणार असेल तर हा गैरप्रकार रोखण्यासाठी मनसेलाच खळ्ळ-खटॅक करावं लागेल, असा स्पष्ट इशारा शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.  

‘पीएम- नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर जावेद अख्तर यांना बसला हा धक्का

‘पीएम- नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे पोस्टर पाहून गीतकार जावेद अख्तरयांना चांगलाच धक्का बसला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये चित्रपटाशी निगडित असलेल्या सगळ्यांची नावे लिहिण्यात आलेली आहेत. या नावात जावेद अख्तर यांचे देखील नाव आहे. त्यामुळेच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या चित्रपटाचे पोस्टर ट्वीट करून त्यांनी त्यासोबत लिहिले आहे की, या पोस्टरवर माझे नाव पाहून मला धक्काच बसला... कारण या चित्रपटातील कोणतीच गाणी मी लिहिलेली नाहीत. 

‘पीएम- नरेंद्र मोदी’चा ट्रेलर पाहून युजर्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पीएम- नरेंद्र मोदी’ ह्या बायोपिकचा ट्रेलर काल गुरुवारी रिलीज झाला आणि हा ट्रेलर पाहिल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना नेटकऱ्यांनी हा ट्रेलर पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. ‘पीएम- नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहे. पण विवेकने मोदींच्या भूमिकेला जराही न्याय दिला नसल्याचे मत अनेक लोकांनी दिले आहे. ‘ पीएम मोदी विवेकपेक्षा चांगले अभिनेते आहेत,’ असे एका युजरने लिहिले आहे. अनेक लोकांनी हे बायोपिकमध्ये २०१९ चा बेस्ट कॉमेडी चित्रपट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

टॅग्स :पी. एम. नरेंद्र मोदीमनसेमुंबई