Join us

पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, कृषी मंत्री असताना काय केले? शरद पवारांनी थेट यादीच वाचून दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 12:49 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसापूर्वी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी २६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौरा केला. यावेळी त्यांनी अहमदनगर येथील निळवंडे धरणाचा डाव्या कालव्याचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली."केंद्रीय मंत्री असताना त्यांनी राज्यातील शेतीसाठी काय केले? असा सवाल मोदींनी केला, यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. आज पहिल्यांदाच खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पीएम मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. पवार यांनी कृषीमंत्री काळात शेती क्षेत्रात केलेल्या कामाची यादीच वाचून दाखवली.

आज खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. खासदार शरद पवार म्हणाले, पंतप्रधान हे संविधानिक  पद आहे. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, असं सांगत खासदार पवार यांनी २००४ ते २०१४ मध्ये घेतलेल्या निर्णयांचे वाचन केले. 

'भाजपास पैसे देणारे उद्योगपती कर्जे बुडवून परदेशात, पंतप्रधान असताना मोदींनी काय केले?'; सामनातून हल्लाबोल

शरद पवार म्हणाले, मी कृषीमंत्री होतो तेव्हा देशात अन्न धान्याचा तुटवडा होता.  २००४ ते २०१४ या काळात देशातील तांदळाचे उत्पादन वाढवले, मी कृषीमंत्री असताना एमएसपी १३८% होते. २००४ ला तांदळाचे भाव ५५० रुपये क्विंटल होता २०१४ ला तांदळाचा भाव १३१० रुपये होता.  तर गव्हाचे दर २००४ ला ६३० रुपये क्विंटल होता तो २०१४ ला १४०० रुपये झाला यात १२२ टक्के वाढ झाली. सोयाबीन ८४० रुपये क्विंटल होता तो २०१४ ला २५०० रुपये झाला म्हणजे यात १९८ टक्के वाढ झाली. कापूस १७२५ रुपये होता तो ३७०० केला म्हणजे ११४ टक्के वाढ झाली.  

"ऊसाची किंमत ७३० होती ती २१०० केली १८८ टक्के वाढ झाली. हरभरा १४०० होता तो ३१०० केला. मका ५१० त्यावरुन १३१० केला, ही वाढ झाली. ही माहिती देतोय ती कृषी मंत्रालय भारत सरकारची अधिकृत माहिती आहे, असंही शरद पवार म्हणाले.   

२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या कामाचे कौतुक केले होते. तसेच २०१२ मध्ये जागतिक अन्नसंघटनेने मान्य केले की भारतात तांदळाचे विक्रमी उत्पादन झाले.पंतप्रधान हे संविधानिक पद आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही. त्यांनी केलेले विधान वास्तवावर आधारित नाही, त्यांना वास्तवाचा भान दिसत नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसनरेंद्र मोदीभाजपा