Join us  

"भोंग्याबाबत आम्हाला कुणी अक्कल शिकवू नये, मोदींनी राष्ट्रीय धोरण आणावं", संजय राऊतांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 10:42 AM

तुम्हाला जर भोंगे उतरवायचे असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत राष्ट्रीय धोरण आणावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

मुंबई-

आम्हाला भोंग्यांबाबत कुणाकडून अक्कल शिकण्याची गरज नाही. भोंग्यांबाबतचा वाद भाजपानेच निर्माण केला आहे. काही लोकांचं भोंग्याच्या नावाखाली राजकीय ढोंग सुरू आहे. तुम्हाला जर भोंगे उतरवायचे असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत राष्ट्रीय धोरण आणावं, असं आवाहन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

"भोंग्यांच्या नावाखाली काही लोक राजकीय ढोंग करत आहेत. यामुळे हिंदुत्व बदनाम होत आहे. पंतप्रधान मोदींना आमचं आवाहन आहे की त्यांनी देशभरासाठी एक धोरण निश्चित करावं. मग ते भोंगे कोणतेही असोत. मशिदीवरचे भोंगे असोत मंदिरावरचे असो किंवा मग तुम्ही निर्माण केलेले राजकीय भोंगे असोत. सर्वांसाठी नियम निश्चित करा आणि याची सुरुवात आधी बिहारमधून करा. महाराष्ट्र कायद्याचं पालन करणारं राज्य आहे. आम्ही नक्कीच धोरणाचं पालन करू", असं संजय राऊत म्हणाले. 

'बाळासाहेबांनी मुस्लिमांशी नेहमी चर्चेतनं विषय सोडवले'संजय राऊत यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मुस्लिम धर्मियांचा नमाज आणि मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेची आठवण यावेळी करुन दिली. "बाळासाहेब ठाकरेंनी रस्त्यावरचे नमाज बंद व्हावेत यासाठी मुस्लिम बांधवांशी चर्चेतून मार्ग काढला होता. मशिदी लहान असल्यानं मुस्लिम बांधवांना रस्त्यावर नमाज पठण करावं लागत होतं. मुस्लिम बांधवांना मशिदीसाठी वाढीव एफएसआय देण्याची मागणी केली होती. जेणेकरुन मशिदीची उंची वाढवता येईल आणि रस्त्यावरचे नमाज पठण बंद होईल. बाळासाहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कानावर ही गोष्ट टाकून त्यावर विचार करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर मुंबईत रस्त्यावर होणारे नमाज पठण बंद झालं होतं हा इतिहास आहे. त्यावेळी यावर तोडगा काढायची हिंमत शिवसेनेनं दाखवली होती. मोदींनी तशी हिंमत आता भोंग्यांबाबत दाखवावी आणि राष्ट्रीय धोरण आणावं. याची सुरुवात बिहार, दिल्ली, गुजरातपासून करावी. आम्हीही त्याचं पालन करू", असं संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनानरेंद्र मोदीराज ठाकरे