PM नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, शहरात साडे चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
By मनीषा म्हात्रे | Published: January 18, 2023 10:04 PM2023-01-18T22:04:57+5:302023-01-18T22:08:55+5:30
वांद्रे-कुर्ला संकूल, अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात १९ जानेवारीला प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा ९०० अधिकाऱ्यांसह साडे चार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. तसेच, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही पोलिसांडून करण्यात आले आहे.
वांद्रे-कुर्ला संकूल, अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात १९ जानेवारीला २४ तासांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. पोलिसांनी या भागात ड्रोन, पॅराग्लायडर आणि रिमोट कंट्रोल मायक्रोलाईट एअरक्राफ्टच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे, नरेंद्र मोदी यांच्या मार्गादरम्यान कडेकोट सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९०० अधिकाऱ्यांसह ३५६२ पोलीस कर्मचारी तैनात आहे. तसेच, मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातुन सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. सायबर पोलीस सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे, मुंबई पोलिसांच्या दिमतीला बॉम्ब शोधक व नाशक पथक, राज्य दहशतवाद विरोधी पथक, जलद प्रतिसाद पथकासह, राज्य राखीव बल विविध यंत्रणा तैनात असणार आहे.
कुठल्याही आस्थापना बंद नाही
नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त बीकेसीतील आस्थापना बंद राहणार असल्याबाबतचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी मुंबई पोलीस प्रवक्ते प्रशांत कदम यांनी ही माहिती खोटी असून अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे.