पीएमसीचे खातेदार हवालदिल; कंपन्यांना वेतन देणेही अशक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 03:50 AM2019-10-22T03:50:01+5:302019-10-22T06:34:54+5:30
घरभाडे, मुलांची फी, वीजबिल भरायचे कसे?
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांमुळे अनेक खातेदारांची अवस्था फारच वाईट झाली आहे. काहींना आपल्या मुलांची शाळा-कॉलेज, तसेच क्लासची फी भरताना अडचण येत आहे, काही निवृत्तांना घर कसे चालवायचे, हा प्रश्न पडला आहे, तर काही कंपन्या व उद्योगांच्या मालकांना कामगार, कर्मचाऱ्यांचे वेतन देणे, सरकारचा कर भरणे, विजेचे बिल देणे अशक्य होऊ न बसले आहे.
पीएमसी बँकेचे व्यवस्थापन व एचडीआयएल कंपनी यांनी मिळून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याने आरबीआयने गेल्या महिन्यात निर्बंध घातले. तेव्हा खातेदारांना सहा महिन्यांत एकदाच १0 हजार रुपये काढण्याची मुभा दिली. आता ती ४0 हजार रुपये करण्यात आली आहे, पण सहा महिन्यांत ४0 हजार म्हणजे महिन्याला जेमतेम ६५00 रुपये होतात. एवढ्याशा रकमेत महिनाभर घर चालविणे अशक्य आहे, अशी तक्रार अनेकांनी केली आहे. निवृत्तांचे तर अधिक हाल आहेत. दोन वेळच्या जेवणाखेरीज घरभाड्याबरोबरच त्यांचा औषधांचा खर्चही बराच असतो. त्यासाठी पैसे आणायचे कोठून, हा या खातेदारांचा सवाल आहे.
अनेकांनी निर्बंध लादले जाण्यापूर्वी विजेच्या बिलाचे, तसेच सरकारी कराचे धनादेश पाठविले होते. काहींनी आपल्या कामगारांनाही पगाराचे धनादेश दिले होते. ते सारे धनादेश बाउन्स झाले आहेत. त्यामुळे एकीकडे दंड भरावा लागणार आणि बिलांची व कराची थकबाकी झाल्याने नोटिसा येणार वा वीज कापली जाणार, अशी भीती आहे.
पगार देता येत नाही, अशी मालकांची तक्रार, तर पगार मिळत नसल्याने कामगार व कर्मचारीही हवालदिल. काहींनी उद्योग व कार्यालये बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, तर काहींनी पगार कधी देता येईल, हे सांगता येत नाही, असे कर्मचाऱ्यांना कळविले आहे.
ऐन दिवाळीच्या काळात बोनस तर सोडाच, पण पगार नसल्याने कर्मचारी निराश झाले आहेत. काहींच्या घरी कोणी आजारी आहे, तर काहींना मुलांची फी भरायची आहे.
एका खातेदाराने सांगितले की, त्याच्या पत्नीच्या डायलिसिससाठी दरमहा १0 हजार रुपये खर्च येतो. सारा पैसा पीएमसी बँकेत ठेवला
होता. आता डायलिसिसअभावी पत्नीचे काही झाले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा त्याचा सवाल आहे. घोटाळेबाजांऐवजी आम्हाला शिक्षा का? एका वृद्ध दाम्पत्याने सांगितले की, त्यांना मुले नाहीत. जवळच्या नातेवाइकांची स्थितीही चांगली नाही. आमचा दर महिन्याचा औषधांचा खर्चच किमान आठ हजार रुपये असतो. जेवणखाण, घरभाडे, वीजबिल यांचा खर्च वेगळाच. कोणाकडे उसने मागावेत, अशीही स्थिती नाही. शिवाय किती काळ कोण उसने पैसे देईल? ज्यांनी घोटाळा केला, त्यांना कडक शिक्षा करा, पण सध्या गुन्हे भलत्याचे आणि शिक्षा आम्हाला असे झाले आहे. आम्हाला आमच्या खात्यातील सर्व रक्कम काढू द्या, अन्यथा आम्हाला जगताच येणार नाही.