पीएमसी बँकेत 6500 कोटींहून अधिक घोटाळा, 10.5 कोटींची रक्कम रेकॉर्डवरून गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 07:53 AM2019-10-18T07:53:22+5:302019-10-18T07:53:59+5:30
PMC Bank scam: बँकेच्या रेकॉर्डमधून एकूण 10.5 कोटींची रक्कम गायब झाल्याचे समितीने म्हटले आहे.
मुंबई : पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) घोटाळा प्रकरणात बँकेच्या इंटर्नल चौकशी समितीने मोठा खुलासा केला आहे. बँकेच्या रेकॉर्डमधून एकूण 10.5 कोटींची रक्कम गायब झाल्याचे समितीने म्हटले आहे.
इंटर्नल चौकशी समितीला एचडीआयएल आणि इतर संबंधीत कंपन्यांकडून जारी करण्यात आलेले अनेक चेक मिळाले आहेत. हे चेक बँकेत कधीच जमा करण्यात आले नाहीत. तरी सुद्धा त्यांना पैसे देण्यात आले. तसेच, बँकेत झालेला घोटाळा हा 4,355 कोटी रुपयांचा नाही तर 6500 कोटींहून अधिक असल्याचेही समोर आले आहे.
पीएमसी बँकेच्या इंटर्नल चौकशी समितीला जे चेक मिळाले आहे. ते 10 कोटींहून अधिक रक्कमेचे आहेत. तर बाकीच्या 50-55 लाख रुपयांचा काही हिशोब नाही आहे. याशिवाय बँक अधिकाऱ्यांनी सुरुवातीला 4,355 रुपयांचा घोटाळा झाल्याचे सांगितले होते. मात्र, आता या घोटाळ्याचा आकडा वाढला असून 6500 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
बँक रेकॉर्डवरून फक्त 10.5 कोटी रुपये गायब झाल्याची माहिती मिळते. दरम्यान, आरबीआयकडून नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकाने दिलेल्या आदेशानुसार बँकेच्या आर्थिक व्यवहारांची इंटर्नल चौकशी करण्यात येत होती. या चौकशीत मोठा घोटाळ्या झाल्याचे समोर आले आहे.
पीएमसी बँकेचा माजी संचालक सुरजीतसिंग अरोराला अटक
पीएमसी बँकेचा माजी संचालक सुरजीतसिंग अरोराला बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. तर, याप्रकरणी अटकेत असलेल्या एचडीआयएलचे राकेश वाधवा आणि सारंग वाधवा या पिता-पुत्रासह माजी अध्यक्ष वरियम सिंग कर्तार सिंग यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तर तिघांकडील चौकशी पूर्ण झाल्याने वाधवा पिता-पुत्रासह वरियम सिंगच्या न्यायालयीन कोठडीची मागणी बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
अन्य संचालकांना लूक आऊट नोटीस जारी
पीएमसी बँकेच्या संशयाच्या भोवऱ्यातील अन्य संचालकांना देश सोडणे शक्य होऊ नये, यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी त्यांना लूक आऊट नोटीस जारी केली.