पीएमसी बँक घोटाळा: प्रवीण राऊतांची ७२ कोटींची संपत्ती जप्त; आर्थिक गुन्हे शाखेची धरपकड सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 01:37 AM2021-01-02T01:37:24+5:302021-01-02T07:02:00+5:30
आर्थिक गुन्हे शाखेची धरपकड सुरू
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची सुमारे ७२ कोटी रुपयांची संपत्ती शुक्रवारी जप्त केली. पीएमसी बँक घोटाळ्यात ४ हजार ३३५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास करीत आरोपींची धरपकड सुरू केली.
पुढे या घोटाळ्याची व्याप्ती वाढत गेल्याने ईडीने या घोटाळ्याचा पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू असताना, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्याकडे केलेल्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. प्रवीण राऊत आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाल्याची माहिती समोर आली.
ईडीच्या चौकशीत असे समोर आले की, राऊतने षडयंत्र करत ९५ कोटींची फेरफार केला. यात, पीएमसी बँकेकडून एचडीआयएलने घेतलेले कर्ज, ॲडव्हान्सचा स्रोतही बेकायदेशीर होता. प्रवीण राऊत यांना दिलेल्या पेमेंट्सच्या समर्थनार्थ कोणतीही कागदपत्रे / करार मिळून आले नाहीत. एचडीआयएलकडून पालघर परिसरातील जमीन खरेदी करण्यासाठी हा निधी देण्यात आल्याचे समाेर आले.
लाख रुपये पत्नी माधुरीला दिले. माधुरीने यातील ५५ लाख रुपये वर्षा संजय राऊत यांना दिले. पुढे याच पैशांतून दादरमध्ये फ्लॅट खरेदी केल्याचे समोर आले. तसेच तपासात समोर आलेल्या माहितीत वर्षा संजय राऊत आणि माधुरी प्रवीण राऊत या अवनी कन्स्ट्रक्शनच्या भागीदार आहेत. तसेच त्यांची १२ लाख कर्जाची रक्कम अद्याप बाकी असल्याचीही माहिती समोर येत आहे. दुसरीकडे ५ जानेवारी रोजी वर्षा राऊत हजर राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वर्षा राऊत यांना मंगळवारी चौकशीला बोलावले
या व्यवहारांबाबत चौकशी करण्यासाठी ईडीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावत २९ डिसेंबर रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र त्या चौकशीला हजर राहिल्या नाहीत. त्यांनी ५ जानेवारीपर्यंत ईडीकडे वेळ मागितला. त्यानंतर ईडीने त्यांना पुन्हा समन्स बजावत ५ जानेवारीला हजर राहण्यास सांगितले.