पीएमसी बँक घोटाळा: राजनीत सिंग याच्या घराची झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 03:12 AM2019-11-18T03:12:32+5:302019-11-18T03:12:49+5:30
बॅँकेचा संचालक राजनीत सिंगला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई : पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बॅँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या बॅँकेचा संचालक राजनीत सिंग याला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी रविवारी त्याच्या सायन कोळीवाड्यातील घराची झाडाझडती घेत महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली. राजनीत सिंग हा भाजपचे जेष्ठ नेते व माजी आमदार तारा सिंग यांचा पुत्र आहे.
पीएमसी बॅँक घोटाळा प्रामुख्याने हाउसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरला (एचडीआयएल) दिलेल्या ४,३५५ कोटींच्या बेकायदेशीर कर्जामुळे झाला आहे. त्यांना कर्जवाटपात सहकार्य आणि वसुलीच्या कामात दुर्लक्ष केल्याचा ठपका राजनीत सिंगवर आहे. शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेने त्याला सखोल चौकशी करून अटक केली होती. रविवारी सकाळी त्याला सुट्टीच्या न्यायालयात हजर केले असता २५ नोव्हेंबरपर्यंत कोठडी देण्यात आली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक त्याला घेऊन सायन कोळीवाडा येथील त्याच्या घराकडे गेले. तेथील सीबीएम हायस्कूलच्या कर्मक्षेत्र सोसायटीतील फ्लॅटची सुमारे अडीच तास झडती घेण्यात आली. त्यात बॅँकेशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे, दस्तऐवज जप्त केल्याचे सांगण्यात आले. त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
राष्टÑपती राजवटीनंतर कारवाईला वेग
पीएमसी बॅँकेतील बहुतांश पदाधिकारी व संचालक भाजपशी संबंधित असल्याने पोलिसांकडून कारवाईत दिरंगाई करीत असल्याचा आरोप ठेवीदार करत होते. भाजपचे नेते तारा सिंग याचा मुलगा राजनीत सिंग हा जबाबदार असतानाही राजकीय हस्तक्षेपामुळे त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मात्र राज्यात राष्टÑपती राजवट लागू झाल्याने अधिकाऱ्यांवरील दबाव काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे राजनीत सिंगला अटक झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.