Join us

पीएमसी बँक घोटाळा: माजी आमदार तारा सिंग यांचा मुलगा रणजीत सिंग अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 4:43 AM

मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बॅँकेच्या (पीएमसी) हजारो कोटींच्या घोटाळ्यास जबाबदार असल्याप्रकरणी भाजपचे माजी आमदार तारा सिंग यांचा मुलगा व बॅँकेचा संचालक रणजीत सिंग याला मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. बॅँकेकडून हाउसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चरला (एचडीआयएल) दिलेल्या अनियमित कर्जप्रकरणी सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने, त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.कर्जपुरवठ्याप्रकरणी शनिवारी सकाळपासून रणजीत सिंगकडे सखोल चौकशी करण्यात येत होती. समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने त्याला सायंकाळी सातच्या सुमारास अटक करण्यात आली. पीएमसी बॅँकेच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांची आतापर्यंतची ही नववी अटक आहे.देशभरात शाखा असलेल्या पीएमसी बॅँकेत साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दीड महिन्यापूर्वी रिझर्व्ह बॅँकेने बॅँकेवर निर्बंध आणले. त्यामुळे हजारो खातेदारांची कोट्यवधीची रक्कम अडकल्याने ऐन दिवाळीत त्यांच्याकडून आंदोलन करण्यात येत होते. बॅँकेने एचडीआयएलला ४,३५५ कोटी कर्ज बेकायदेशीरपणे दिलेले आहे. रणजीत सिंग हा कर्जवसुली समितीचा सदस्य होता. मात्र, त्याच्याकडून कर्जाच्या परतफेडीबद्दल योग्य कार्यवाही करण्यात आली नाही. उलट त्याकडे त्याने दुर्लक्ष केल्याचे आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या तपासातून स्पष्ट झाले. त्यामुळे शनिवारी त्याला अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी पाचारण केले होते. सुमारे चार तास कसून चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पीएमसी बॅँकेच्या घोटाळ्याप्रकरणी गेल्या दीड महिन्यात बॅँकेचे कार्यकारी संचालक जॉय थॉमस, माजी अध्यक्ष वेयम सिंग, एचडीआयएलचे प्रमुख राकेश वाधवा, त्याचा मुलगा सारंग, बॅँकेचे लेखा परीक्षक अनिता किर्डत, जयेश संघानी व केतन लोखंडवाला यांना अटक झालेली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे रमन सिंग याच्यावरील कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आरोप बॅँकेच्या ठेवीदारांकडून करण्यात येत होता. आत या प्रकरणी आणखी काही संचालक व अधिकाºयांवरही कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :पीएमसी बँकभाजपा