नीरव मोदींच्या मेव्हण्यावरील वॉरंट पीएमएलए न्यायालयाने केले रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 07:48 AM2021-09-08T07:48:47+5:302021-09-08T07:49:17+5:30
नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी याने पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी ईडी करत आहे. तसेच न्यायालयाने मेहता याला देश सोडून जाण्यापूर्वी तपास यंत्रणेला त्याबाबत माहिती देण्याचे निर्देशही दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी याचा मेव्हणा मैनक मेहता न्यायालयात हजर राहिल्यावर विशेष पीएमएलए न्यायालयाने त्याच्यावर काढलेले वॉरंट मंगळवारी रद्द केले. वॉरंट रद्द करताना विशेष न्यायालयाने मेहता याला ईडीला तपासकार्यात मदत करण्याचे निर्देश दिले.
नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी याने पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी ईडी करत आहे. तसेच न्यायालयाने मेहता याला देश सोडून जाण्यापूर्वी तपास यंत्रणेला त्याबाबत माहिती देण्याचे निर्देशही दिले. मैनक मेहता हा नीरव मोदी याची बहीण पूर्वी मेहताचा पती आहे आणि या प्रकरणी पूर्वी मेहता स्वतः माफीचा साक्षीदार बनण्यास तयार आहे. मेहता हाँगकाँगवरून मुंबईत विशेष न्यायालयात हजेरी लावण्यासाठी आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ईडीने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मेहता याचा जबाब नोंदविला आहे. आता त्यांना हा जबाब निश्चित करायचा आहे. वॉरंट रद्द करण्यासाठी मैनक आणि पूर्वी यांनी वॉरंट रद्द करण्यासाठी न्यायालयात दोन स्वतंत्र अर्ज केले. दोघांनीही सरकारी वकिलांचे साक्षीदार बनण्याची तयारी दर्शविल्याने वॉरंट रद्द करावे, अशी विनंती न्यायालयाला केली.
मैनक मेहताच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती ईडीच्या हाती
nमुंबई : न्यायालयातून दिलासा मिळताच पीएनबी बँक घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा मेहुणा मैनक मेहता मंगळवारी ईडी अधिकाऱ्यांपुढे हजर झाला आहे. त्यानुसार ईडी अधिकारी त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत.
nनीरव मोदी याच्याविरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी मैनक मेहता हे मंगळवारी पीएमएलए कोर्टापुढे हजर झाले. तेथे त्यांचा वॉरंट रद्द केल्यानंतर दुपारच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानुसार ईडी अधिकारी त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत. त्यांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता ईडी अधिकाऱ्याकडून वर्तविण्यात येत आहे.
चार तास चौकशी
नीरव मोदीचा मेहुणा मैनक मेहता सव्वा आठच्या सुमारास ईडी कार्यालयातून बाहेर पडले. त्यांची चार तास चौकशी झाली. पुढे गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती ईडी सूत्रांनी दिली.