नीरव मोदीने केलेल्या आर्थिक घोटाळ्यात पीएनबीचाही सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 04:15 AM2019-12-05T04:15:58+5:302019-12-05T04:20:02+5:30
पीएनबीने ज्या २३ जणांच्या नावे ही हमीपत्रे तयार केली होती, त्यातील २१ जण नीरव मोदीच्या थेट संबंधांतील होते.
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) १४ हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेला व प्रकरण उघड होताच भारतातून पळून गेलेल्या नीरव मोदीला या बँकेनेच बेकायदा मदत केली केली होती, असे फॉरेन्सिक आॅडिटमधून (न्यायवैद्यक पडताळणीमध्ये) उघड झाले आहे.
बेल्जियममधील प्रख्यात बीडीओ या आॅडिट कंपनीकडे फॉरेन्सिक आॅडिटचे काम सोपविण्यात आले होते. तिने आतापर्यंत ५ अंतरिम व एक अंतिम अहवाल पीएनबीला सोपविला आहे. त्यात या बेकायदा हमीपत्रांचा उल्लेख आहे. या घोटाळ्याचा तपास सीबीआयमार्फत सुरू असून, तेथील आर्थिक व्यवहाराच्या तपासणीचे काम पंजाब नॅशनल बँकेनेच बीडीओ या आॅडिट कंपनीकडे सोपविले होते. त्यात पीएनबीने २८ हजार कोटी मूल्याची १५६१ हमीपत्रे (लेटर आॅफ अंडरटेकिंग) नीरव मोदीला दिली होती, असे दिसून आले. त्यापैकी तब्बल २५ हजार कोटी रुपयांची १,३८१ हमीपत्रे बेकायदेशीर पद्धतीने दिली होती.
पीएनबीने ज्या २३ जणांच्या नावे ही हमीपत्रे तयार केली होती, त्यातील २१ जण नीरव मोदीच्या थेट संबंधांतील होते. त्यातील १९३ हमीपत्रांचा गैरवापर केल्याचे या फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले. हा अहवाल अमेरिकेतील इंटरनॅशनल कन्सोर्टियम आॅफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट या संस्थेने मिळविला आहे. या अहवालामध्ये नीरव मोदीच्या भारतातील २0 मालमत्तांचा उल्लेख आहे, पण यापैकी कोणतीही मालमत्ता कर्जासाठी तारण म्हणून ठेवण्यात आली नव्हती, हे विशेष.
महागड्या कार्स, बोट व पेटिंग्ज
बीडीओ कंपनीने आपल्या अहवालात नीरव मोदीकडील १५ महागड्या कार्स, एक बोट, १0६ अत्यंत महाग अशी पेटिंग्ज आदींचा उल्लेख केला आहे. एम. एफ. हुसैन, राजा रवी वर्मा, जामिनी रॉय आदींच्या या कलाकृती आहेत. या सर्वांची किंमत सुमारे २0 कोटी रुपये आहे.