पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीच्या कार्यालयांवर ईडीची धाड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 12:26 PM2018-02-15T12:26:50+5:302018-02-15T13:35:32+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा झाला आहे

PNB fraud case: ED raided in Neerav Modi's office | पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीच्या कार्यालयांवर ईडीची धाड

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीच्या कार्यालयांवर ईडीची धाड

Next

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० कोटी रुपयांचा महाघोटाळा झाला आहे. घोटाळ्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सक्तवसुली संचलनालयाने याप्रकरणी घोटाळ्याचा सुत्रधार आणि प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक निरव मोदी याच्या कार्यालयांवर छापेमारी सुरु झाली आहे. निरव मोदी याच्या मुंबईतसहित तीन शहरांमधील शोरुम आणि कार्यालयांवर छापेमारी झाली आहे. घोटाळा समोर आल्यानंतर निरव मोदी  व अन्य तिघे देश सोडून फरार झाले आहेत. अधिका-यांशी संगनमत करूनच हा घोटाळा करण्यात आला असल्याची शक्यता आहे. विजय मल्ल्यापेक्षाही मोठा घोटाळा दिसत आहे. घोटाळा समोर आल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे शेअर कोसळले आहेत. घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी यांची आई आणि भावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय पीएनबीने सीबीआयला लूकआऊट नोटीस जारी करण्यास सांगितलं आहे.


बँकेनेच स्वत:हून यासंबंधीचे पत्र शेअर बाजाराला पाठविले आहे. १७७.१७ दशलक्ष डॉलर्स म्हणजे, सुमारे ११,४२७ कोटी रुपये संबंधितांनी विदेशात राहून वळते केल्याचे त्यात म्हटले आहे. मात्र, बँकेने त्यात संशयितांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. अर्थात, बँकेतील आधीच्या २८0 कोटींच्या घोटाळ्याच्या सीबीआयने सुरू केलेल्या तपासात निरव मोदीचे नाव आले होते. त्यामुळे तोच या घोटाळ्याचा सूत्रधार असावा, असा अंदाज आहे.

कोण आहे नीरव मोदी ?
नीरव मोदीची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. त्याला 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत. नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. 

47 वर्षीय  नीरवचे वडील देखील हिरेव्यापारीच होते.  नीरव वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला.  नीरवला भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.
 

मल्ल्यापेक्षाही मोठा घोळ
याबाबत सीबीआयच्या सूत्रांनी स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला. मात्र आधी २८० कोटी रुपये व आता ११,५०० कोटी रुपये, या दोन्ही घोटाळ्यांची कार्यपद्धती सारखीच आहे. त्यामुळे आता सीबीआयने या संपूर्ण घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे. हा विजय मल्ल्यापेक्षाही मोठा बँक घोटाळा आहे, असे सांगण्यात आले.

सर्वसामान्यांची रक्कम धोक्यात
पीएनबीमध्ये रिझर्व्ह बँक व सर्वसामान्य ठेवीदार यांच्यामार्फत पैसा येतो. समभागधारकांचाही पैसा बँकेत आहे. घोटाळ्याची तक्रार करताना बँकेने ‘संशयास्पद व्यवहार’ असा उल्लेख केला आहे. ही खाती सर्वसामान्य ठेवीदारांची असून घोटाळा केलेल्यांची नावेही बँकेला माहीत नाहीत.

बँकेच्या समभागधारकांचेही ३ हजार कोटींचे नुकसान
पैसा वळता करण्यासाठी बँकेकडून ‘अंडरटेकिंग’ नोट मिळविण्यात आली आणि तिच्याआधारे संबंधितांनी विदेशात राहून अन्य बँकांकडून कर्जेही मिळवल्याची शक्यता पीएनबीने व्यक्त केली आहे.
बँकेतील गोकुळनाथ शेट्टी आणि मनोज खरात या कर्मचाºयांच्या मदतीने ‘अंडरटेकिंग’ पत्र मिळवत निरव मोदी, निशाल मोदी, अमी मोदी व मेहुल चोकसी या हिरे व्यावसायिकांनी याच ब्रीच कॅन्डी शाखेत २८० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे ५ फेब्रुवारीला समोर आले होते.
हा महाघोटाळा उघड झाल्यानंतर देशातील गितांजली, गिन्नी, नक्षत्र आणि निरव मोदी या चार प्रमुख ज्वेलर्सवर तपास यंत्रणांची नजर आहे. तपासणी सुरु आहे. या महाघोटाळ्यामुळे बुधवारी बँकेच्या समभागधारकांचेही
सुमारे ३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.

तीन बँका संकटात
या घोटाळ्यात संबंधितांनी विदेशात राहून अन्य बँकांकडून कर्जे घेतल्याचे पंजाब नॅशनल बँकेने पत्रात नमूद केले आहे. अन्य बँकांमध्ये अलाहाबाद बँक, युनियन बँक आॅफ इंडिया व खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेचा समावेश असल्याचे बोलले जाते.

Web Title: PNB fraud case: ED raided in Neerav Modi's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.