Join us

PNB fraud: मोदींकडून कोटयवधींचे कमीशन घेतल्यानंतर आता बँक कांगावा करतेय; वकिलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 8:37 AM

गेल्या कित्येक वर्षांपासून बँकेला त्यांचा हिस्सा मिळत होता

मुंबई: नीरव मोदी यांनी केलेल्या व्यवहारांसाठी पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रूपयांचे कमिशन मिळाले. मात्र, आता बँक ही गोष्ट नाकारत आहे. मुळात हा सगळा बँकेचा व्यावसायिक मामला होता. परंतु, त्याला घोटाळ्याचे स्वरूप देण्यात आले, असा आरोप नीरव मोदी यांचे वकील विजय अग्रवाल यांनी केला. अग्रवाल यांनी मंगळवारी मध्यरात्री प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी या प्रकरणाबाबत अनेक खुलासे केले. त्यांनी म्हटले की, नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून केवळ 280 कोटी रूपयांचेच कर्ज घेतले होते. व्याजाची रक्कम धरून हा आकडा 5000 कोटींपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे माध्यमांकडून सांगण्यात येणारा 11,500 कोटी रूपयांचा आकडा खोटा आहे. त्यांना ही माहिती कोणी दिली, हे मला माहिती नाही. परंतु, सीबीआयने आपल्या अहवालात मोदीने 280 कोटींचे कर्ज घेतल्याचे म्हटले आहे, असा दावा अग्रवाल यांनी केला. तसेच विजय अग्रवाल यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या दुटप्पी भूमिकेवरही टीका केली. नीरव मोदी यांनी केलेल्या व्यवहारांपोटी बँकेने कोट्यवधी रुपयांचे कमिशन घेतले आहे. बँकेला मोदी करत असलेल्या व्यवहारांची पूर्णपणे माहिती होती. परंतु, आता बँक ही गोष्ट मानायला तयार नाही. मुळात हा संपूर्ण व्यावसायिक बँकिंग व्यवहार असताना त्याला घोटाळ्याचे स्वरूप देण्यात आले. गेल्या कित्येक वर्षांपासून बँकेला त्यांचा हिस्सा व्यवस्थितपणे मिळत होता, असेही अग्रवाल यांनी म्हटले. नीरव मोदी हे देशाबाहेर पळून गेलेले नाहीत. त्यांचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. ते व्यावसायिक कारणांसाठी परदेशात असतानाच हे संपूर्ण प्रकरण समोर आले. आता त्यांचा पासपोर्टही रद्द करण्यात आला आहे. नीरव यांच्या कुटुंबातील काही जणांकडे परदेशी नागरिकत्त्व आहे.  त्यामुळे ते बराच काळ भारताबाहेर असतात, असेही अग्रवाल यांनी सांगितले.  

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळानीरव मोदीगुन्हा अन्वेषण विभाग