पो. नाईक साळुंखेंचे नेत्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2016 01:35 AM2016-03-14T01:35:20+5:302016-03-14T01:35:20+5:30
कासारवडवली उपशाखेचे पोलीस नाईक चंद्रकांत वामन साळुंखे (४४) यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची पत्नी कीर्ती साळुंखे यांनी धाडसी निर्णय घेऊन त्यांच्या पश्चात त्यांच्या नेत्रांचे दान केले
ठाणे : कासारवडवली उपशाखेचे पोलीस नाईक चंद्रकांत वामन साळुंखे (४४) यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची पत्नी कीर्ती साळुंखे यांनी धाडसी निर्णय घेऊन त्यांच्या पश्चात त्यांच्या नेत्रांचे दान केले. हे नेत्रदान ठाणे सिव्हील रुग्णालयात झाल्यावर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सुपेगाव येथे रवाना झाले. अशा प्रकारे नेत्रदान करणारे ते शहर पोलीस दलातील बहुधा पहिलेच कर्मचारी ठरले आहेत.
साळुंखे हे २४ जुलै १९९५ रोजी ठाणे शहर पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर, ते कासारवडवली पोलीस ठाण्यात सहा वर्षे कार्यरत होते. तर, २०१३ पासून ते शहर वाहतूक शाखेत रुजू झाल्यावर मागील एक वर्षापासून ते वाहतूक शाखेच्या कासारवडवली उपशाखेत कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी कीर्ती यांनी घेतलेल्या निर्णयानंतर नेत्रदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
कळवा-विटावा येथे राहणारे चंद्रकांत साळुंखे हे अहमदनगर येथील सुपेगावचे मूळ रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून मुलगा यंदा दहावीला असून मुलगी सहावीत शिकत आहे.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार मूळ गावी करण्यात येणार असल्याने शनिवारी दुपारी अडीच वा.च्या सुमारास त्यांचे पार्थिव अहमदनगरला रवाना झाले. या वेळी त्यांच्यासोबत वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी-कर्मचारी गेल्याची पोलिसांनी दिली.
(प्रतिनिधी)