Join us  

टास्कच्या नावाखाली खिसा रिकामी; राजस्थानी टोळी जाळ्यात, माटुंगा पोलिसांची कामगिरी

By मनीषा म्हात्रे | Published: May 02, 2023 6:48 PM

पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली विविध टास्क देत खाते रिकामी करणाऱ्या राजस्थानी टोळीचा माटुंगा पोलीस ठाण्यातील सायबर पथकाने पर्दाफाश केला आहे.

मुंबई : पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली विविध टास्क देत खाते रिकामी करणाऱ्या राजस्थानी टोळीचा माटुंगा पोलीस ठाण्यातील सायबर पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या त्रिकुटाने शेकडो जणांना गंडविल्याचा संशय असून त्यांच्याकडून ३२ मोबाईल आणि ७२ सिमकार्ड जप्त करण्यात आले आहे.

माटुंगा परिसरात राहणाऱ्या  सुकन्या सुनिल परब २६ याना ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता घरी असताना इंस्टाग्राम अकाउंट आणि अँमेझोनवर पार्ट टाइम जॉबची बनावट जाहिरात पाहून त्यावर क्लिक केले. त्यानंतर अँमेझोन कंपनीतुन बोलत असल्याचे भासवून पार्ट टाइम जॉब बाबत विचारणा केली. सावज जाळ्यात अडकताच, त्यांना एक लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगितले. पुढे बँक खाते लिंक करण्यास भाग पाडले. पुढे वेगवेगळे टास्क देत त्यांचे खाते रिकामे केल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. माटुंगा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.

आरोपीच्या मोबाईल लोकेशनच्या मदतीने माटुंगा पोलीस ठाण्यातील सायबर अधिकारी दिगंबर पगार व पथक यांनी दोघांना मुंबईतून ताब्यात घेतले. सुरजसिंग भंवरसिंग (३१), आणि देवी सिंग कालूसिंग रावल (३१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघांच्या चौकशीतून एक आरोपी अजमेरचा असल्याचे समोर येताच पथक तेथे रवाना झाले. तेथून आरोपी मुंबईकडे निघाल्याचे समजताच पथकाने मुंबईत सापळा रचला. विनोद कुमार गोपाललाल अग्रवाल (४५)  याला अटक केली आहे. ३२ मोबाईल अन ७२ सिमकार्ड जप्त  अटक करण्यात आलेल्या त्रिकूटाकडून ३२ मोबाईल, ७२ सिमकार्ड, ५० डेबिट कार्ड, १९ बँक पासबुक व चेकबुक, १७ पॅनकार्ड, १६ आधारकार्ड आणि ७ रबर स्टॅम्प जप्त करण्यात आले आहे. शेकडो जणांना गंडाया टोळीने अशाच प्रकारे शेकडो जणांना गंडविल्याचा संशय पथकाला असून त्यानुसार, अधिक तपास सुरु आहे. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी