Join us

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे खिशाला झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाऊनमध्ये आधीच रोजगार हिरावला असून, तारेवरची कसरत करून सामान्यांना घर चालवावे लागत आहे. त्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लॉकडाऊनमध्ये आधीच रोजगार हिरावला असून, तारेवरची कसरत करून सामान्यांना घर चालवावे लागत आहे. त्यात इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. शनिवारी पेट्रोलने शंभरी पार केली असून, या दरवाढीची सर्वसामान्यांच्या खिशाला झळ सोसावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

सांताक्रूझ येथील राजन मोर्ये म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेल सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम करतात. त्यामुळे त्यांचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने प्राथमिकता दर्शविली पाहिजे, अन्यथा महागाईने गरिबांचे कंबरडे मोडेल. एकतर कोरोनाने रोजगार हिरावला आहे, व्यवसाय ठप्प आहेत. त्यात पेट्रोलने शंभरी पार केल्याने तोंडचे पाणीच पळाले आहे. त्यामुळे इंधनावरील अधिभार रद्द करून, सर्वसामान्यांना दिलासा द्यावा,

तर कुर्ला येथील विद्येश धनावडे म्हणाले की, कुरिअरच्या कामासाठी दररोज दुचाकीची गरज लागते. काही महिन्यांपूर्वी दीडशे ते दोनशे रुपयांचे पेट्रोल टाकले तरी मुंबई व आसपासच्या परिसरात फिरून व्हायचे. मात्र, आता एक लिटर पेट्रोल शंभरीपार गेल्याने दररोज चारशे ते पाचशे रुपयांचे पेट्रोल भरावे लागते. दिवसभराची संपूर्ण कमाई जर पेट्रोलमध्ये घालविली तर मग फायदा काय? सरकारने पेट्रोलच्या किमती लवकरात लवकर नियंत्रणात आणायला हव्यात, अन्यथा सामान्य माणसाचा उद्रेक होऊ शकतो.

आता सायकलचाच पर्याय

सायन येथील अनिल गोसावी म्हणाले की, सरकार महागाई रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोरोनामुळे आधीच सामान्य माणसांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. अशातच पेट्रोलच्या रूपाने सरकारने सामान्य माणसांना झटका दिला आहे. आता प्रवासासाठी सायकलशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

कोट

इंधन दरवाढीमुळे इतर वस्तूंचेदेखील भाव वाढतात. यामुळे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडते. आधीच सामान्य माणूस कोरोनाचा सामना करीत आहे. त्यात आता सर्वच वस्तूंचे भाव वाढल्यावर माणसाने नेमके जगायचे तरी कसे. सरकारने ही महागाई आटोक्यात आणायला हवी, अन्यथा हा सामान्य माणसावरील आर्थिक ओझे व ताण वाढत जाणार आहे.

- नयना त्रिमुखे ,मानखुर्द

पेट्रोल दरवाढ म्हणजे कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने वैयक्तिक वाहन घेऊन बाहेर पडावे लागते. गेल्या काही दिवसांत इंधनाचे दर गगनाला भिडल्याने खिशावर अतिरिक्त ताण पडला आहे. सरकारने वेळीच यावर तोडगा काढावा, अन्यथा जनतेच्या प्रखर रोषाला सामोरे जावे लागेल.

- अनिल देसाई, मालाड