पॉकेटमनीतील पैसे विद्यार्थी देणार आनंदवनला
By Admin | Published: February 1, 2015 10:50 PM2015-02-01T22:50:04+5:302015-02-01T22:50:04+5:30
स्वत:ची आर्थिक गणिते बाजूला ठेवून वेगळ्या वाटेने समाजकार्य करणारे फार थोडेच आहेत. अशांची दखल कधी ना कधीतरी घेतलीच जाते.
विजय मांडे, कर्जत
स्वत:ची आर्थिक गणिते बाजूला ठेवून वेगळ्या वाटेने समाजकार्य करणारे फार थोडेच आहेत. अशांची दखल कधी ना कधीतरी घेतलीच जाते. डॉ. प्रकाश आमटे यांचे आनंदवन व हेमलकसा ही अशीच एक लोकबिरादरी. बाबा आमटे आणि त्यांचा वसा चालविणारे डॉ. प्रकाश आमटे यांंच्या कार्याने प्रेरित झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी चक्क पॉकेटमनी जमवून तो या आनंदवनाला देण्याचे ठरवले आहे. त्यांचे विचार इतर विद्यार्थ्यांसाठी अनुकरणीय असेच म्हणावे लागतील.
कोकण ज्ञानपीठ कर्जत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सामाजिक जाणिवेतून डॉ. प्रकाश आमटे यांच्या आनंदवन व हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पांना भेट देऊन त्यांना या कार्यासाठी खारीचा वाटा म्हणून देणगी देणार आहेत. महाविद्यालयातील प्रा. जितेंद्र भामरे, प्रा. गिरीश गलगटे, प्रा. जयश्री भांडे, प्रा. अनिल काळे, प्रा. रु पेश पारठे, प्रा. कांचन लाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे ४० विद्यार्थी, विद्यार्थिनी हेमलकसा व आनंदवनसाठी रवाना झाले आहेत.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या पॉकेटमनीतील सुमारे १० हजार रुपये जमा केले असून कर्मचारी आणि अन्य विद्यार्थ्यांनी जमविलेली २० हजार रुपयांची रक्कम तसेच कोकण ज्ञानपीठ संस्थेने दिलेले ५० हजार रु पये अशी एकूण ८० हजार रुपयांची देणगी डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला देणार आहेत.
या उपक्र मासाठी निघालेल्या सर्व सदस्यांना कडाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच संध्या पवाळी, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब रूपनवर, प्रा. गजानन उपाध्ये, विजय लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निरोप व शुभेच्छा दिल्या.