मुंबई : एकट्याने प्रवास करताना महागड्या हॉटेलमध्ये राहणे सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे अनेकदा रेल्वेस्थानक, टर्मिनसवरच त्यांना रात्र काढावी लागते. प्रवाशांसाठी सुख-सोयींनी सुसज्ज अशी छोट्या आकारातील पॉड हॉटेल उभारण्याचा निर्णय इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझमने (आयआरसीटीसी) घेतला आहे. मुंबई सेंट्रल येथे त्याचे काम ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार असून प्रवाशांसाठी नोव्हेंबरपासून खुले होणार आहे. या पॉड हॉटेलमधील खोल्या कमी दरात प्रवाशांना मिळणार आहेत.
रेल्वे स्थानकांलगत आधुनिक सोयी-सुविधांयुक्त राहण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना नाइलाजास्तव खासगी हॉटेलमध्ये जावे लागते. बहुतांश रेल्वे स्थानक परिसरातील खासगी हॉटेलचे दर आवाक्याबाहेर असल्याने काही जण रेल्वे स्थानकांवरच रात्र काढतात. यामुळे परवडणाऱ्या दरात सुरक्षित आणि आरामदायी सुविधा देण्यासाठी पॉड हॉटेल सुरू करण्यात येत आहेत. मुंबई सेंट्रल येथे पॉड हॉटेलचे काम ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार आहे. मुंबई सेंट्रल येथे ४८ खोल्यांचे पॉड हॉटेल असेल. तळमजल्यावर पी आकाराच्या २६ खोल्या असतील. पोटमाळ्यावर टी आकाराच्या २१ खोल्या असणार आहेत. एक खोली विशेष व्यक्तींसाठी राखीव असणार आहे. हॉटेलमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात येतील. त्याचबरोबर हॉटेल परिसरात स्वच्छतागृह, कॉफीशॉप अशा अन्य सुविधादेखील पुरवण्यात येतील, असे आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
पॉडमध्ये कोणत्या सुविधा असणार आहेत?
१ आरामदायी बेड
२ लहान खाजगी सॅटेलाइट टीव्ही
३ मोबाइल चार्जिंग सुविधा
४ वातानुकूलित सुविधा
५ वॉल मिरर
६ स्मोक डिटेक्टर आणि अग्निप्रतिरोधक यंत्रणा
-----
भारतीय रेल्वेतील हे पहिले पॉड हॉटेल आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रवाशांसाठी नव्या प्रकारची सुविधा आम्ही देणार आहोत. प्रवाशांना जास्तीत जास्त फायदा व्हावा हा आमचा प्रयत्न आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. हे हॉटेल ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असून नोव्हेंबरमध्ये हॉटेल प्रवाशांसाठी खुले होईल.
-वरिष्ठ अधिकारी, आयआरसीटीसी