मुंबई : कुर्ला-बीकेसी-वांद्रे भागातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता मिळताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा काढली आहे. त्यामुळे वांद्रे ते कुर्ला मार्गावर २०२६ मध्ये पॉड टॅक्सी धावताना दिसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वांद्रे ते कुर्ला या ८.८ कि.मी. अंतरावरील प्रवासासाठी प्रवाशांकडून १८४ रुपये भाडे आकारले जाणार आहे.
बीकेसी हे देशातील प्रमुख आर्थिक केंद्र असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरही ते नावारूपाला येत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील मुख्यालये, त्याचबरोबर भारतासह जगभरातील विविध बँका, वित्तीय संस्थांची कार्यालयेही बीकेसीत आहेत. भारत डायमंड बोर्स, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, जिओ गार्डन, मुंबई क्रिकेट असोसिएशन, युनायटेड स्टेट्स कॉन्सुलेट जनरल, ब्रिटिश डेप्यूटी हाय कमिशन यांचीही कार्यालये बीकेसीत आहेत.
सद्य:स्थितीत बीकेसीतील विविध कार्यालयांमध्ये सुमारे ४ लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या भागात कायमच वर्दळ दिसते. मात्र, त्याचा फटका वाहतुकीला बसून या भागात नेहमीच कोंडीला सामोरे जावे लागते. सद्य:स्थितीत बीकेसीतील एमटीएनएल जंक्शनपासून कुर्ला स्थानक गाठण्यासाठी कारला १६ मिनिटे तर बसला २४ मिनिटे लागतात. ऐन गर्दीच्या वेळी त्यामध्ये आणखी भर पडते. यावर तोडगा काढण्यासाठी वांद्रे ते कुर्लादरम्यान १ हजार १६ कोटी रुपये खर्चून पॉड टॅक्सी प्रकल्प उभारण्यात येत आहे. सार्वजनिक- खासगी-भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
रोज १ लाख प्रवाशांची अपेक्षा -
कंत्राटदाराची नियुक्ती केल्यानंतर प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. कंत्राटदाराला ३० वर्षांसाठी सवलत कालावधी दिला जाणार आहे.
पॉड टॅक्सी ३.५ मीटर लांब आणि १.४७ मी. रुंद, तर १.८ मी. उंच असेल. तिचा वेग हा ४० कि.मी. प्रति तास (कमाल) असेल. यासाठी अंदाजित ५००० चौरस मीटरचा डेपो वांद्रे-कुर्ला संकुलात प्रस्तावित आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यावर २०३१ पर्यंत दरदिवशी पॉड टॅक्सीतून १ लाख ९ हजार प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा एमएमआरडीएने व्यक्त केली जात आहे.
१) टॅक्सीचा वेग : ४० किमी प्रतितास
२) दर किलोमीटर अंतरासाठी : २१ रुपये
३) पॉड टॅक्सीची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता : ६ प्रवासी