मुंबई : अंधेरी स्थानकासारख्या गर्दीच्या स्थानकांवर असंख्य स्त्रिया आणि मुली स्वत:चा बचाव करीत, सांभाळत, सावरत प्रवास करतात. लोकांच्या नजरा, नको ते आणि नको तिथले स्पर्श चुकवीत हव्या त्या ठिकाणी सुरक्षित पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा मुलींना, स्त्रियांना या सगळ्याची पर्वा न करता कधी प्रवास करता येईल का? जगता येईल का? श्वास घेता येईल का, असे असंख्य प्रश्न जिज्ञा सुजाताने आपल्या शब्दांतून तरुणाईसमोर मांडले. हे मांडताना या सगळ्यांपासून आपण वेगळे आहोत का? असाल तर पळून न जाता याला वाचा फोडा, असे आवाहनही केले. मूड इंडिगोच्या कवितांच्या या सत्राने आजची तरुणाई केवळ इकडच्या तिकडच्या विषयांवर न बोलता वास्तववादी बोलण्यावर भर देत असल्याचे स्पष्ट झाले.
आशियातील सर्वांत मोठा कल्चरल फेस्टिव्हल समजल्या जाणाºया आयआयटी मुंबईच्या मूड इंडिगोला गुरुवारपासून सुरुवात झाली. २९ डिसेंबरपर्यंत चालणाºया या फेस्टिव्हलमध्ये पहिल्याच दिवशी तरुणाईची गर्दी दिसून आली. पुढील दिवसांत २३० हून अधिक कार्यक्रमांची रेलचेल येथे असणार आहे. व्यवसायाने स्क्रिप्ट रायटर असलेल्या जिज्ञा सुजाताने सार्वजनिक ठिकाणी महिलांसोबतच्या छेडछाडीवर कवितेतून निशाणा साधला तर अभिषेक सिन्हाने दिल, भीड अशा आशयाच्या विषयांवर कवितेतून भावना व्यक्त केल्या. याशिवाय मूड इंडिगोमध्ये त्याआधी झालेल्या वुमन इन कॉमेडी सत्रानेही चांगलीच गर्दी जमवली आणि कॉमेडीच्या क्षेत्रातील आता असलेला स्त्रियांचा सहज वावर मांडण्याचा प्रयत्न केला.चार दिवस चालणाºया मूड इंडिगोमध्ये भारतीय कलाकार असलेले अमित त्रिवेदी, शंकर एहसान लॉय, प्रीतम, आशा भोसले, विशाल शेखर, सलिम सुलेमान, सोनू निगम, कैलाश खेर यांचे कॉन्सर्ट होणार आहे. तर परदेशातील द हकेन, पोकुर्पाईन ट्री, सिम्पल प्लॅन आणि डीजे विनाई यांचे कॉन्सर्ट होणार आहे. तसेच लिटफेस्टमध्ये पी. चिदंबरम, नारायण मूर्ती, अर्णब गोस्वामी, देवेंद्र फडणवीस, बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार, आमिर खान, नसरुद्दीन शाह, मनोज वाजपेयी यांच्याशी विद्यार्थ्यांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी रॉक बॅण्ड स्पर्धा, डान्स स्पर्धा, फेस पेंटिंग स्पर्धा, टाकाऊपासून उत्कृष्ट वस्त्रे बनविण्याची ट्रॅशन स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, देसी बिट्स, जस्ट अ मिनिट्स, संस्कृती अशा विविध स्पर्धांचे या वेळी आयोजन करण्यात येणार आहे.