दुर्गेश सोनार
मुंबई : कोणत्याही कवीसाठी त्याची कविता हा श्वास असते, त्याच्या जगण्याचं कारण असते. आई जशी लेकराला जिवापाड जपते, अगदी तसंच कवीही आपल्या कवितेला जिवापाड जपत असतो. मात्र, हीच जिवापाड जपलेली कविता विकण्याची वेळ एखाद्या कवीवर आली तर? नेमकी ही दुर्दैवी वेळ मराठीतील आघाडीचा उमदा तरुण कवी संतोष नारायणकर याच्यावर आली आहे. लॉकडाऊनमुळे संतोषला रोजगार गमवावा लागला आहे. कुटुंबाची गुजराण कशी करायची असा सवाल त्याच्यासमोर आहे. यातूनच आलेल्या नैराश्यातून त्याने आपल्या कविता विकण्याचा निर्णय घेतला आहे. तशी पोस्ट त्याने फेसबुकवर केली आहे.
परभणीमध्ये वास्तव्याला असलेला संतोष नारायणकर हा आपल्या कवितांमुळे महाराष्ट्रभरात परिचित आहे. ‘ऐका ऐका दोस्तांनो, मायबापाची कहाणी, माय नारळी खोबरं, बाप नारळाचं पाणी...’ ही त्याची कविता अनेकांच्या ओठांवर आहे. संतोषच्या यासारख्या कितीतरी सरस कवितांना रसिकांची दादही मिळालेली आहे. अनेक कविसंमेलनं संतोषच्या कवितांनी गाजवली आहेत. मात्र, घरची बेताची परिस्थिती आणि त्यातच कोरोनाचं संकट यामुळे त्याला चरितार्थ चालवणं कठीण झालंय.
पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या संतोषने नोकरीसाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, पदरी निराशाच आली. त्याने मध्यंतरीच्या काळात परभणी शहरात रिक्षाही चालवली. नंतर, त्याला उभारी देण्यासाठी परभणीतील ज्ञानसाधना प्रतिष्ठानने त्यांच्या वसतिगृहात सेवकाची नोकरी दिली. त्यानंतर त्याच्या संसाराचा गाडा रुळावर आला होता. मात्र, लॉकडाऊन लागला आणि वसतिगृह बंद झालं. गेले वर्षभर वसतिगृह बंद असल्याने संतोषवर पुन्हा एकदा घरी बसण्याची वेळ आली. त्यातच लॉकडाऊनमुळे कार्यक्रमही बंद झाले. उरलीसुरली पुंजीही आता हाताशी राहिली नसल्याचं शल्य संतोषच्या बोलण्यात पदोपदी जाणवतं. याच नैराश्यातून त्याने आता आपल्या कविताच विकायला काढल्या आहेत. ज्या कवितेने त्याला ओळख दिली, त्याचेच भांडवल त्याला जगण्यासाठी आधार म्हणून हवे आहे. त्याने तशी पोस्ट शुक्रवारी फेसबुक या समाजमाध्यमावर केली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे संतोष सारख्या अनेक उमद्या कलावंतांची रोजीरोटी हिरावली गेली आहे. त्यावर राज्य सरकारने आणि समाजातील संवेदनशील व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेऊन त्यांना आधार देण्याची गरज व्यक्त होते आहे.
हीच ती फेसबुक पोस्ट कविता विकणे आहेत...आजवरची हीच काय ती कमाई.... अडचणीच्या या काळात येईल मदतीला, ही खात्री. आजवर लिहिलेल्या तीन एक हजार कवितांपैकी केवळ आणि केवळ मला व माझ्या वह्यांनाच ठाऊक असलेल्या कविता विकणे आहेत... योग्य किंमत मिळाल्यास नावावर करून दिल्या जातील... गोपनीयतेच्या ग्वाहीसकट