मुंबई, दि. 2- विविध साहित्यप्रकारांत स्वतःची स्वतंत्र लेखनशैली निर्माण केलेल्या ज्येष्ठ लेखिका-कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाने हरहुन्नरी साहित्यिक गमावला आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या शोकसंदेशात विनोद तावडे म्हणतात, सुप्रसिद्ध लेखक आचार्य अत्रे यांच्या लेखनाचा वारसा लाभलेल्या आणि लेखनाचे बाळकडू मिळालेल्या शिरीष पै यांनी कथा, कविता, ललित लेखन,बाल साहित्य, नाटक या सगळ्या साहित्य प्रकारांमध्ये स्वतःचा एक लेखक-कवी म्हणून आगळावेगळा ठसा उमटवला आहे. मराठी साहित्य प्रांतात 'हायकू’ हा अभिनव काव्यप्रकार रुजवून तो वाढवण्यात शिरीष पै यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ज्येष्ठ लेखिका-कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांच्या पार्थिवाचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या दादर शिवाजी पार्क येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेतले. दिवंगत पै यांच्या कुटुंबीयाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने दिवंगत पै यांना तावडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.