मुंबई: एकीकडे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यापुढे FASTag साठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे फास्टटॅग लावूनही मुंबईच्या वेशीवरील टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तांत्रिक अडचणींमुळे फास्टटॅगच्या रांगेत वाहनचालकांचा खोळंबा होत असल्याची कबुली टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी दिली. असाच अनुभव कवी आणि गीतकार संदिप खरे यांना आला आहे. या संदर्भातील व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
संदीप खरे यांना पुणे-कोल्हापूर महामार्गावरील किणी टोलनाक्यावरील त्यांचा अनुभव फेसबुकद्वारे सांगितला आहे. माझ्या गाडीवरील FASTag स्कॅन न झाल्याने टोल प्लाझावरील कर्मचाऱ्याने गाडी थांबवली. त्यानंतर एका छोट्या मशीनने तो टॅग स्कॅन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो झाला नाही. त्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागेल असं सांगण्यात आलं. यात टोल ७५ आणि दंड ७५ रुपये अशी रक्कम भरण्यास सांगण्यात आले. त्यावर माझ्याकडे फास्टॅग असल्याने मी भरणार नसल्याची भूमिका घेतली, असं संदीप खरे यांनी व्हिडिओद्वारे सांगितले.
संदीप खरे यांच्या या भूमिकेनंतर तुम्हाला थांबायचे असेल तर थांबा, असं त्यांच्याकडून सांगण्यात आले. काही वेळाने मॅनेजर आला, त्यानेही दंड भरावा लागणार असल्याचे सांगितले. नंतर तो टॅग स्कॅन झाला. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये माझे १० मिनीटे वाया गेले. यावर संबंधीत प्रशासनाने काहीतरी उपाय काढण्याची विनंती खरे यांनी केली आहे.
टोलनाक्यांवर वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी सध्या केंद्र सरकारने फास्टटॅगची योजना आणली आहे. यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही अनेक वाहनधारकांनी दुर्लक्ष केले. मात्र, आता यापुढे ज्यांच्या वाहनाला फास्टटॅग नसेल त्यांना टोलनाक्यावर दुप्पटीने टोल भरावा लागणार आहे. त्यामुळेच बहुतांश वाहनधारकांनी असे फास्टटॅग बसवून घेतले आहे. फास्टटॅग असणाऱ्या वाहनांसाठी प्रत्येक टोलनाक्यावर स्वतंत्र रांगा आहेत.
काय असतो फास्टॅग?
-फास्टॅग हा एक टॅग किंवा स्टिकर आहे. ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानावर काम करते.-टोलनाक्यावरील कॅमेरा स्टिकरवरचा बारकोड स्कॅन करतो आणि टोल आपोआप फास्टॅगच्या वॉलेटमधून कापला जातो.-वाहनधारकांना टोलनाक्यावर खोळंबावे लागत नाही. त्यामुळे वेळ आणि इंधन यांची बचत होते. प्रवासही झटपट होतो.
कुठे मिळतो फास्टॅग?
- फास्टॅग ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करता येऊ शकतो- ॲथॉराइज्ड बँकेतून अथवा ई-कॉमर्स व्यासपीठांवरूनही ऑनलाइन मिळू शकतो- देशातील २३ ॲथॉराइज्ड बँका, भूपृष्ठ वाहतूक विभागाचे हजारो विक्री केंद्रे येथेही फास्टॅग तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो.
फास्टॅगची किंमत
- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी फास्टॅगची किंमत १०० रुपये एवढी निश्चित केली आहे. याशिवाय २०० रुपये अनामत रक्कम भरावी लागते- अनेक बँका आपल्याकडे ग्राहक आकर्षित व्हावे यासाठी किरकोळ किमतीचे फास्टॅगही देऊ करतात.