नाट्यगृहाच्या भिंतीवर फुलली कविता...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:06 AM2021-04-17T04:06:19+5:302021-04-17T04:06:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई मुंबईच्या उपनगरातील नाट्यरसिकांचे नाट्यवेड जिथे रंगात येते, ती वास्तू म्हणजे बोरिवलीचे प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह! ...

Poetry blossomed on the wall of the theater ...! | नाट्यगृहाच्या भिंतीवर फुलली कविता...!

नाट्यगृहाच्या भिंतीवर फुलली कविता...!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

मुंबईच्या उपनगरातील नाट्यरसिकांचे नाट्यवेड जिथे रंगात येते, ती वास्तू म्हणजे बोरिवलीचे प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह! सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नाट्यगृहांवर पडदा पडला असला, तरी या नाट्यगृहाच्या बाबतीत एक अनोखी घटना घडली आहे. या नाट्यगृहाच्या वर्धापनदिनी चक्क नाट्यगृहाच्या भिंतीवर कविता फुलली आहे.

प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाला याच आठवड्यात २१ वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून ज्येष्ठ रंगकर्मी सुहास कामत यांनी उत्स्फूर्तपणे एक गीत त्यांच्या लेखणीतून कागदावर उतरवले. या नाट्यगृहाला उद्देशून 'मनोरंजनाला हो आधार मिळाला' अशी शब्दसुमने गुंफलेले गीत त्यांनी लिहून काढले. वास्तविक, असे गीत केवळ वहीच्या पानांतच दडून राहिले असते; मात्र या गीताचे भाग्य असे की सहज म्हणून लिहिले गेलेले हे गीत या नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाच्या पसंतीस उतरले. व्यवस्थापनाने या गीताचा फलक बनवून तो या नाट्यगृहाच्या दर्शनी भिंतीवर लावण्याचा निर्णय घेतला. लगोलग स्थानिक रंगकर्मीं आणि नाट्यगृह व्यवस्थापकांच्या उपस्थितीत या फलकाचे अनावरणही करण्यात आले. सध्या ही काव्यसुमने प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या दर्शनी भागाची शोभा वाढवत आहेत.

चौकट:-

अभिमानास्पद गोष्ट...

-

सुहास कामत (ज्येष्ठ रंगकर्मी)

एखाद्या गीतरचनेचा अशाप्रकारे गौरव होणे तसे दुर्मीळच; त्यामुळे माझ्या या गीताला हा बहुमान मिळाला, याचा मला आनंद आहे. आपल्या लेखणीतून उतरलेली कविता अशाप्रकारे नाट्यगृहाच्या भिंतीवर झळकणे, ही कुठल्याही रंगकर्मीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

सोबत : फोटो.

Web Title: Poetry blossomed on the wall of the theater ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.