काव्यरसातून येते चिरतरुणता - उषा मेहता
By admin | Published: April 25, 2017 01:48 AM2017-04-25T01:48:07+5:302017-04-25T01:48:07+5:30
काव्यरस हा प्रत्येकाला वयोमान विसरायला लावून चिरतरुण करणारा साहित्य प्रकार आहे. तसेच, मोहना कारखानीस यांच्या
मुंबई : काव्यरस हा प्रत्येकाला वयोमान विसरायला लावून चिरतरुण करणारा साहित्य प्रकार आहे. तसेच, मोहना कारखानीस यांच्या ‘मोहर’ काव्यसंग्रहातील कविता वाचूनसुद्धा ही भावना अधोरेखित होते, असे मत ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता यांनी व्यक्त केले.
मोहना कारखानीस यांच्या डिंपल पब्लिकेशन्स प्रकाशित ‘पैंजण’ कथासंग्रहाचे व भरारी प्रकाशन प्रकाशित ‘मोहर’ काव्यसंग्रहाचे शानदार प्रकाशन बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड, ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता, साहित्यिक, नाटककार सुरेश खरे, कोमसापच्या विश्वस्त रेखा नार्वेकर, दूरदर्शनच्या कार्यक्रमांचे निर्माते रविराज गंधे, साहित्यिका माधवी कुंटे, गौरी कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला.
मोहना कारखानीस यांचे साहित्य हे एक नवी अनुभूती देणारे आहे. त्यामुळे त्याच्या वाचनातील आनंद हा द्विगुणित करणारा आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांनी व्यक्त केले. तर मोहना कारखानीस यांच्या कथासंग्रहातील ‘मी सासू बनते’ या कथेचे अभिवाचन सुरेश खरे यांनी करून कार्यक्रमात रंगत आणली. या वेळी खरे यांनी सांगितले की, कथांमध्ये पु. ल. देशपांडे, चि. वि. जोशी व जयवंत दळवी आदी विनोदी लेखकांच्या निर्मळ विनोदांची झलक आहे. साहित्यिक रविराज गंधे यांनी हे साहित्य अत्यंत गुणवान असल्याचे सांगून त्यात सातत्य व नावीन्यता वाढविल्यास अजूनही चांगले साहित्य आपल्याला लेखिकेकडून वाचायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. साहित्यिका माधवी कुंटे यांनी पैंजण कथासंग्रहाबद्दल सांगितले की, या कथा सगळ्या स्तरातील लोकांसाठी लिहिलेल्या आहेत तर गौरी कुलकर्णी म्हणाल्या की, एकंदरीत कथांमध्ये स्थल, काल, परिस्थिती, व्यक्ती या सगळ्यांचा विचार केला आहे. (प्रतिनिधी)