Join us  

‘मान्सून’ की बात; ‘एल निनो’चे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 5:49 AM

प्रत्यक्षात मान्सूनच्या आगमनाचा विषय हा मुंबईशी निगडित नाही, तर देशाशी निगडित आहे.

- सचिन लुंगसेजून महिन्याच्या सुरुवातीला देवभूमी म्हणजे केरळमध्ये दाखल होणारा मान्सून ७ जून रोजी मुंबईत दाखल होतो, असा सर्वसाधारणरीत्या अंदाज बांधला जातो. यास ठोस असा कोणताही वैज्ञानिक आधार नाही. परंतु पूर्वापारप्रमाणे ७ जून ही तारीख मुंबईतल्या मान्सूनच्या  आगमनाची  तारीख मानली जात असल्याने मुंबईकरही आवर्जून या काळात मान्सूनची वाट पाहतात. हवामान खात्याकडील नोंदीचा  आधार घेतला असता गेल्या दीडएकशे वर्षांत फारच कमी वेळा मान्सून ७ जूनच्या आसपास मुंबईत दाखल झाला आहे. अन्यथा १० ते १५ जूनच्या आसपास मुंबईकरांनी मान्सूनचे स्वागत केले आहे.प्रत्यक्षात मान्सूनच्या आगमनाचा विषय हा मुंबईशी निगडित नाही, तर देशाशी निगडित आहे. हवामान खाते मे महिन्यात मान्सूनचा अंदाज बांधते. या वेळी मान्सून देशात केव्हा दाखल होईल यापेक्षा देशाच्या चार भागांत पावसाची सरासरी किती असेल? यावर भर दिला जातो. पण असे असले तरी यात मान्सूनच्या आगमनाची तारीखही तेवढीच महत्त्वाची असते. कारण त्याच्या आगमनावर, आगमानापूर्वी नोंदविण्यात येत असलेल्या हवामानावर पुढील अंदाज बांधले जातात. गेल्या काही वर्षांत ग्लोबल वॉर्मिंगचा मान्सूनवर होणारा परिणाम हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. प्रत्यक्षात हवामान खाते याबाबत उघडपणे बोलत नसले, तरी पर्यावरणतज्ज्ञ हमखासपणे यावर बोट ठेवत आहेत. जागतिक तापमान वाढीमुळे मान्सूनमध्ये होणारे बदल, पावसाचे कमी होणारे प्रमाण, मान्सूनच्या आगमानात होणारे बदल, पावसाच्या प्रमाणात होणारी घट अशा अनेक नोंदींची दखल हवामानतज्ज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ घेत आहेत.

१९५१ सालापासून मान्सूनच्या मुंबईतील आगमनाच्या तारखा पाहिल्या तर असे लक्षात आले की, १९५२, ५३, ७३, ७७, ७९, ८७, ९९, २००७, २०११ आणि २०१३ या वर्षी मान्सून ७ जूनच्या आसपास मुंबईत दाखल झाला आहे. १९५५, १९६१, १९७१, १९७७, १९८९ आणि २००५ या वर्षी मान्सून ७ जूनपेक्षाही अगोदर म्हणजे २९ मेच्या आसपास मुंबईत दाखल झाल्याची नोंद हवामान खात्याकडे आहे. आणि उर्वरित वर्षांत मान्सून १३, १८ आणि २३ जूनच्या आसपास मुंबईत दाखल झाल्याच्या नोंदी आहेत. याचा अर्थ २०१९ सालीच मान्सून इतक्या विलंबाने मुंबईत दाखल झालेला नाही, तर तो यापूर्वीही मुंबईत विलंबाने दाखल झाला आहे. परिणामी, या वेळी मान्सून विक्रमी वेळेत उशिराने मुंबईत आला असे नमूद करतानाच १९५१ पासूनच्या मान्सूनच्या आगमनाच्या तारखांच्या नोंदी लेखात देण्यात आल्या आहेत.

‘एल निनो’चे सावटमुळात मान्सूनवर कोणता एकच घटक परिणाम करीत नसतो, तर अनेक घटक मान्सूनवर आपला प्रभाव पाडत असतात. यात जसे जागतिक तापमानवाढ हा विषय आहे तसा ‘एल निनो’ हादेखील आहे. यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चे सावट आहे. जून आणि जुलैमध्ये मान्सूनवर ‘एल निनो’चे सावट राहणार आहे. ‘एल निनो’ जेव्हा प्रभावी असतो तेव्हा त्याचा प्रभाव मान्सूनवर होतो, असे आतापर्यंतचे निरीक्षण आहे.

‘एल निनो’ म्हणजे काय?नाताळदरम्यान दक्षिण अमेरिकेतील किनारी भागांत प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा वाढते.या वेळी हवामानात जे बदल होतात; त्यास एल निनो म्हणतात. एल निनो हा स्पॅनिश शब्द आहे. समुद्राच्या पाण्याची होणारी तापमानवाढ पृथ्वीवरील हवामान बदलाला कारणीभूत ठरत आहे.ही प्रक्रिया अचानक घडते. याचा संबंध दुष्काळी परिस्थिती, महापूराशी जोडला जातो. प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचेतापमान वाढते, प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो; तेव्हा पश्चिमेकडूनपूर्व दिशेकडे वारे वाहतात. अशावेळी ढग जमलेली पाण्याची वाफ तिकडे वाहून नेतात. तेव्हा पूर्वेकडील भागात अतिवृष्टी आणि पश्चिमेकडील भागात दुष्काळी स्थिती, असा एल निनोचापरिणाम होतो.

टॅग्स :मानसून स्पेशल