वांगणी रेल्वे स्थानकातील थरार : रेल्वेमंत्र्यांनी केले मयूरच्या धाडसाचे कौतुक
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : अंध आईसोबत फलाटावरून चालताना सहा वर्षांचा मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडतो... त्याचवेळी समोरून वेगाने एक्स्प्रेस धडधडत येते, गोंधळलेल्या मुलाला ट्रॅकवरून बाजूला होण्याचेही सुचत नाही. काही क्षणांत हा मुलगा ट्रेनखाली चिरडला जाणार असे दिसत असतानाच एक जिगरबाज रेल्वे कर्मचारी धावत येऊन सुपरमॅनसारखा त्या मुलाला सुखरूप वाचवतो. अवघ्या काही सेकंदात तो मुलगाही वाचतो आणि तो जिगरबाज पॉइंट्समनही. ही घटना वांगणी रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी घडली असून, अंगावर काटा आणणारे हे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
पॉइंट्समन असलेल्या मयूर शेळकेच्या या धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
वांगणी रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी संगीता शिरसाट ही अंध महिला तिच्या मुलासोबत फलाटावरून जात होती. मात्र फलाटाचा अंदाज न आल्याने ती चालता चालता अगदी कडेला गेली आणि तिचा मुलगा साहिल रुळावर पडला. त्याचवेळी कर्जतहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारी उद्यान एक्स्प्रेस वांगणी स्थानकात शिरली. या गाडीचा हॉर्न ऐकून संगीता यांनी मदतीसाठी आक्रोश केला. तो ऐकताच वांगणी स्थानकातील पॉइंट्समन मयूर शेळके यांनी क्षणाचाही विलंब न लावता रुळावरून धावत जाऊन या मुलाला फलाटावर ढकलले आणि स्वतःही कसाबसा फलाटावर चढला. अवघ्या काही सेकंदांचा हा खेळ. पण, पाहणाऱ्या सर्वांच्या हृदयाचा थरकाप उडवणारा. या वेळी त्यांच्यापासून उद्यान एक्स्प्रेस अवघ्या काही फुटांवर होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मयूर याने त्या मुलाला वाचवले. या सगळ्या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फूटेज सोमवारी समोर आल्यानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करीत संवाद साधत मयूरच्या धाडसाचे कौतुक केले. तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, मुंबई विभागाचे रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल आणि इतरांनीही शेळके यांना पुरस्कार जाहीर करीत त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. मध्य रेल्वेने या धाडसाबद्दल शेळके यांचा सत्कारही केला.
‘लोकमत’तर्फे मयूर शेळके यांचा गौरव
पॉइंट्समन मयूर सखाराम शेळके यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावर पडलेल्या मुलाचा जीव वाचविला. त्यांच्या या धाडसाबद्दल ‘लोकमत’कडूनही त्यांना सीएसएमटी येथे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
जेव्हा त्या मातेचा आक्रोश कानी पडला तेव्हा केवळ मुलाला वाचविणे हेच माझ्या मनात होते. त्यामुळे या घटनेत आपल्या जीवाचे बरेवाईट होईल याची चिंता त्या क्षणी मनात बिलकूल नव्हती. एका अंध मातेच्या मुलाला वाचविल्याचे समाधान मिळाले आणि आनंद झाला.
- मयूर शेळके, रेल्वे पॉइंट्समन
फोटो - संगीता शिरसाट,
साहिल शिरसाट
‘लोकमत’तर्फे गौरविण्यात आलेले रेल्वेचे पॉइंट्समन मयूर शेळके.