मुंबई - मुंबई महापालिकेच्या बी वॉर्डातील अधिकाऱ्यांना आज विषबाधा झाली आहे. या रूग्णांना नजीकच असलेल्या जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आलं. एकूण १० जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये पाच महिला आणि पाच पुरूष यांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज पालिकेच्या १० जणांना विषबाधा झाल्याप्रकरणी दुपारी साडेचार वाजता जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सर्व जणांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयात आणलं तेव्हा त्यांना मळमळ आणि उलट्या होत होत्या. प्राथमिक अंदाजानुसार, दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. सध्या या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. निशांत सूर्यवंशी (२७), कृष्णकांत धनावडे (४९), चंद्रशेखर पाटील (२५), तनय जोशी (५६), चंद्रकांत जांभळे (४६), तृप्ती शिर्के (३५), प्रतीक्षा मोहिते (२१), सविता पंडित (३५), सुषमा लोखंडे (४७), नरसिंभा कांचन (६५) (कँटीन स्टाफ) अशी विषबाधा झालेल्या रुग्णांची नावे आहेत.