Join us

बोरिवलीत ‘त्या’ झाडांवर विषप्रयोग, स्थानिकांनी काढली अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 1:46 AM

बोरीवली पूर्वेकडील राजेंद्रनगरातील ओम साई सोसायटी येथे काही दिवसांपूर्वी नारळाच्या चार झाडांवर अज्ञातांनी विषप्रयोग केला.

मुंबई : बोरीवली पूर्वेकडील राजेंद्रनगरातील ओम साई सोसायटी येथे काही दिवसांपूर्वी नारळाच्या चार झाडांवर अज्ञातांनी विषप्रयोग केला. सद्य:स्थितीला चार झाडांपैकी एका नारळाच्या झाडाचे आयुष्य संपुष्टाच आले असून, इतर दोन झाडेही लवकरच कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत. मात्र, अद्यापही पोलीस यंत्रणेने आणि महापालिकेने संबंधित दोषींना ताब्यात घेतले नसल्याने परिसरात संतप्त वातावरण आहे. एका नारळाच्या झाडाचा मृत्यू झाल्यानंतर निसर्गप्रेमींसह स्थानिकांनी अंत्ययात्रा काढली.ड्रील मशीनद्वारे छिद्र पाडून विषप्रयोग केलेल्या नारळाच्या चार झाडांपैकी एक झाड जमिनीवर कोसळले आहे. दुसरे झाड मरणाच्या दारात असून त्याच्या फांद्या गळून पडल्या आहेत. जेव्हा अंत्ययात्रा काढण्यात आली तेव्हा नाक्याच्या ठिकाणी पोलिसांनी अडविले. विषप्रयोगात जे सामील आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची ग्वाही पोलिसांनी स्थानिकांनी दिली. तसेच महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेतली नाही, तर त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. २८ जानेवारीपर्यंत संबंधितांवर कारवाई झाली नाही, तर रिव्हर मार्चच्या वतीने ३० जानेवारी रोजी कॅण्डल मार्च काढला जाईल, अशी माहिती रिव्हर मार्चचे सदस्य गोपाळ झवेरी यांनी दिली.काही दिवसांपूर्वी महापालिका आर मध्य विभागाच्या उद्यान विभागातील अधिकाºयांनी विषप्रयोग झालेल्या नारळाच्या झाडांच्या मुळाजवळ मातीचे कुंपण करून त्यात भरपूर पाणी सोडले होते. परंतु या प्रक्रियेला दिरंगाई झाल्यामुळे नारळाच्या चारही झाडांना आपला जीव गमवावा लागला आहे. एक झाड कोसळले असून आणखी तीन झाडे कोसळण्याच्या स्थितीत आहेत, अशी संतापजनक प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. दरम्यान, नारळाच्या झाडांवर विषप्रयोग केलेल्या अज्ञातांवर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती महापालिका आर मध्य विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.