आरे कॉलनीतील झाडांवर ‘विषप्रयोग’; औषधांचा उपयोग करून झाडे सुकवण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 02:54 AM2018-01-09T02:54:14+5:302018-01-09T02:54:26+5:30
शहराची फुप्फसे म्हणून ओळखल्या जाणाºया आरे दुग्ध वसाहतीमधील झाडे नष्ट करण्यासाठी विषारी औषधाचा प्रयोग करून झाडांना सुकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मुंबई : शहराची फुप्फसे म्हणून ओळखल्या जाणाºया आरे दुग्ध वसाहतीमधील झाडे नष्ट करण्यासाठी विषारी औषधाचा प्रयोग करून झाडांना सुकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. येथील युनिट क्रमांक १३मधील पिंपळ व जांभळाच्या खोडावर छिद्रे पाडून विषारी द्रव्याचा वापर करत झाडांना मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी आरे येथील वनराई पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून, घडलेल्या प्रकाराचा तपास सुरू आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
झाडांच्या खोडाला छिद्र करून त्यात विषारी रसायन टाकून झाडांना व्यावसायिकांच्या स्वार्थासाठी मारण्यात येत आहे. आरे कॉलनीतील सतत मोठमोठ्या झाडांवर कुºहाड पडत आहे. त्यामुळे झाडांना धोका आहे, असे स्थानिक नीलेश धुरी यांनी सांगितले. आरेतील कृषी विभागाने सुमारे ६५ वर्षांपूर्वी लावलेल्या रोपांचे मोठ्या डेरेदार झाडामध्ये रूपांतर झाले आहे. याच वाढलेल्या झाडांची कत्तल केली जात आहे. साधारण २०-२२ वर्षांपूर्वी आरेतील सुकलेल्या व मृत तसेच पावसाळ्यात पडलेल्या झाडांचे कंत्राट देण्यात येऊ लागले. शिवाय झाडांच्या खोडावर छिद्र पाडून त्यात विशिष्ट प्रकारचे रसायन टाकून झाडे मारण्यात येऊ लागली आहेत, असा आरोप नीलेश धुरी यांनी केला आहे. येथील सुकलेली व मृत झाडे उचलण्याचे कंत्राट मिळालेल्या शांताराम बांगर व धुरी यांनी पोलीस ठाण्यात दाखल होत घडलेल्या प्रकाराची तक्रार केली आहे.
मागील ४७ वर्षांपासून आरे जंगलात झाडे लावण्यात आली आहेत. आरे कॉलनीचा संपूर्ण परिसर ३ हजार १६६ एकरवर पसरलेला आहे. येथे कोट्यवधी झाडे लावण्यात आली आहेत. यातील झाडे डेरेदार झाली आहेत, पण काही जण या झाडांची कत्तल करत आहेत.
- हरिचंद्र कृष्णा धुरी, स्थानिक